चार लाखांच्या मदतीचा मेसेज बनावट, अर्ज स्वीकारलेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:07+5:302021-09-02T05:11:07+5:30
बीड : कोरोना काळात जिल्ह्यात अनेकांचे मृत्यू झाले. यामध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश होता. दरम्यान, मृत व्यक्तीला केंद्र शासनाकडून ...
बीड : कोरोना काळात जिल्ह्यात अनेकांचे मृत्यू झाले. यामध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश होता. दरम्यान, मृत व्यक्तीला केंद्र शासनाकडून ४ लाख रुपये मिळणार असल्याचे खोटे मेसेज पसरविले जात असून, जिल्हाभरातून दररोज ८ ते १२ अर्ज आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे येत होते. मात्र, हा मेसेच खोटा असून अर्ज करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना काळात नागरिकांची काही खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली, तरीही त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना ४ लाखांची मदत मिळणार असल्याचे खोटे संदेश मोबाइलवर येत होते. त्यासाठी काही जणांनी पैसे उकळून आपण हे पैसे मिळवून देऊ, असे सांगून एका अर्जासह फॉर्म भरण्यास सांगितले होते. मात्र, असे अर्ज आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्वीकारण्यात आले नाहीत.
नागरिकांनी विश्वास ठेवू नये
केंद्रीय गृहविभागाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १४ मार्च, २०२० रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यात मृताच्या वारसांना चार लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे घोषित करण्यात आले होते, परंतु त्याच दिवशी दुसरे परिपत्रक काढून पहिले परिपत्रक मागे घेतले. मात्र, आजही पहिलेच परिपत्रक सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. त्याचा मनस्ताप नागरिकांना होत आहे. कोरोना बळींच्या वारसांसाठी सध्या तरी अशी कोणतीच योजना नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापनाकडे आले होते ५५० अर्ज
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे हे खोटा मेसेज पाहून जवळपास ५५० जण अर्ज करण्यासाठी दोन महिन्यांत आले होते. मात्र, अशा प्रकारे कोणतीही मदत केंद्र शासनाकडून मिळणार नसल्याचे या विभागातून सांगण्यात आले.
अनेकांची फसवणूक
४ लाख रुपये मृताच्या नातेवाइकांना मिळवून देतो, असे सांगून अनेकांनी ५०० ते १ हजार रुपये घेत, हे अर्ज प्रशासनाकडे पाठविणार असल्याचे नातेवाइकांना सांगितले. मात्र, अशी योजनाच नसल्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे. नागरिकांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, अशा स्वरूपाची कोणतीही योजना नसून, असे अर्ज करून वेळ वाया घालवू नये.
-मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी बीड.