लोकवर्गणीतून चार लाख, नाम देणार ४० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:34 AM2021-04-27T04:34:29+5:302021-04-27T04:34:29+5:30
आष्टी : तालुक्यातील कडा येथील कडी नदीच्या खोलीकरण, रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी गावकऱ्यांची लोकवर्गणीतून चार लाख रुपये जमा केले, तर ...
आष्टी : तालुक्यातील कडा येथील कडी नदीच्या खोलीकरण, रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी गावकऱ्यांची लोकवर्गणीतून चार लाख रुपये जमा केले, तर या कामासाठी अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनकडून ४० लाख रुपये मिळणार आहेत.
अनेक वर्षांपासून कडा येथील जल वाहिनी म्हणून ओळखली जाणारी कडी नदी वेड्याबाभळी आणि गाळामध्ये पूर्णपणे भरल्याने तिचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते. पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. त्यातच नद्या-नाल्यांच्या खोलीकरणाअभावी त्यातील सर्वच पाणी वाहून जात आहे. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने महिनाभर वाहनारे नदी-नाले अलीकडे एका दिवसातच कोरडे ठास पडत असतात. साहजिकच जलपुनर्भरणाअभावी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावत चालली आहे. ७० ते ८० फुटांवरील पाण्याची पातळी यंदा तर ३०० ते ४०० फुटांवर गेली आहे. ही सर्व प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेत, कडा येथील नागरिकांनी लोकवर्गणी करून नदी खोलीकरण व रुंदीकरण करण्याचा संकल्प केला. यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी गावात फिरून गावकऱ्यांकडून या कामासाठी चार लाख रुपये लोकवर्गणीतून जमा केले.
२५ एप्रिल रोजी आ.सुरेश धस यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ गावलगतच्या मौलाली बाबा दर्गा येथून करण्यात आला. कडी नदीत पोकलॅण्ड मशीनची पूजा ज्येष्ठ नागरिक गोरख कर्डीले, संजय ढोबळे पाटील यांनी केली. यावेळी सरपंच अनिल ढोबळे, उपसरपंच संपत कर्डीले, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे, योगेश भंडारी, गोरक्षनाथ कर्डीले, कुशाभाऊ देशमुख, बंटी गायकवाड, परमेश्वर कर्डीले, सचिन शिंदे, बाळासाहेब कर्डीले, रमेश देशमुख, राजू गावडे, सुनील अष्टेकर, प्रवीण बहिर, सुमित भंडारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
===Photopath===
260421\img-20210426-wa0514_14.jpg