परळीतील चार नेत्यांना मिळाले आतापर्यंत पालकमंत्रीपद; धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 07:49 PM2023-10-04T19:49:29+5:302023-10-04T19:50:57+5:30
धनंजय मुंडेंना एकाच टर्ममध्ये दोन वेळा पालकमंत्री पदाची लॉटरी
- संजय खाकरे
परळी ( बीड): विधानसभेच्या पाच वर्षातील एकाच टर्म मध्ये दोन वेळा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची संधी मिळण्याचा मान परळी मतदार संघाचे आमदार धनंजय मुंडे यांना लाभला आहे , या पूर्वीही ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस च्या महाविकास आघाडीच्या सत्तेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते .पुन्हा आता राज्यातील नवीन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या महा युतीच्या सत्तेत बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री झाले आहेत.
परळी तालुक्याला पंडितराव दौंड यांच्या माध्यमातून पहिल्यांदा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद प्राप्त झाले होते त्यानंतर गोपीनाथराव मुंडे, पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री पद आले . 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे हे विजयी झाले त्यांनी भाजपच्या उमेदवार, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला. राज्यात 2019 मध्ये शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर धनंजय मुंडे यांची राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपदी निवड झाली व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडे आले.
तेव्हा अडीच वर्ष बीड जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून त्यांनी यशस्वी काम केले तसेच परभणीचे जिल्ह्याचे पालकमंत्री पदही काही महिने त्यांनी सांभळले. पालकमंत्री पदी काम करीत असताना बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. तसेच कोरोना काळात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. परळी तालक्याच्या इतिहासात दोन वेळा पालकमंत्री होण्याची संधी धनंजय मुंडे यांनाच लाभली आहे. पाच वर्षात दोनदा कॅबिनेट मंत्री पदही मिळण्याचा मान ही त्यांना मिळाला आहे.
परळीतील चार नेत्यांना आतापर्यंत संधी
यापूर्वी 1995 मध्ये रेणापूर मतदारसंघातून निवडून आलेले उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे हे भाजप- शिवसेना युतीच्या सत्तेत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले होते. तसेच परळी विधानसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या पंकजा मुंडे यांनीही 2014 ते 2019 मध्ये बीड पालकमंत्री पदाची 5 वर्ष जबाबदारी सांभाळली. आता धनंजय मुंडे हे दुसऱ्यांदा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. परळी तालुक्यातील नाथरा येथील मुंडे कुटुंबाकडे आता पर्यंत सर्वाधिक एकूण चार वेळा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले आहे . तर रेणापुरचे आमदार परळी तालुक्यातील दौंडवाडी येथील पंडितराव दौंड हे 1987 मध्ये दोन वर्ष बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. परळी तालुक्याला पंडितराव दौंड यांच्या माध्यमातून पहिल्यांदा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद प्राप्त झाले होते. त्यानंतर गोपीनाथराव मुंडे, पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री पद आले .