चार महिन्यानंतर खुनाचा झाला उलगडा, प्रेयसीसह सात जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 06:08 PM2021-12-24T18:08:50+5:302021-12-24T18:09:42+5:30
अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा दाबून खून करण्यात येऊन घाईत अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले
बीड : अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा आवळून खून केला व नंतर प्रकरण दडपण्यासाठी कुटुंबास घाईघाईने अंत्यसंस्कार करायला लावून पुरावा नष्ट करण्यात आला. ही घटना करेवाडी (ता. परळी) येथे घडली. घटनेनंतर चार दिवसांनी हे प्रकरण उजेडात आले. चार महिन्यांनंतर २१ डिसेंबर रोजी सिरसाळा ठाण्यात प्रेयसीसह सात जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
बाळासाहेब सुखदेव कावळे (३५, रा. करेवाडी, ता. परळी) असे मयताचे नाव आहे. अरुण सुखदेव कावळे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ बाळासाहेब हा शेती करतो तसेच किरायाने जीपही चालवतो. लग्नापूर्वीपासून त्याचे गावातील उषा खंडेराव ऊर्फ सूर्यकांत काशीद हिच्याशी प्रेमसंबंध होते. २१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री साडेनऊ वाजता बाहेरुन येतो, असे सांगून बाळासाहेब घराबाहेर पडला, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दरम्यान, बाळासाहेब हा प्रेयसी उषा काशीद हिच्या घरी गेला. रात्री पावणेअकरा वाजता त्याला घरात कोंडून उषा काशीद, खंडेराव ऊर्फ सूर्यकांत काशीद, ज्ञानेश्वर सदाशिव काशीद, केशव रामकिसन काशीद, सीताराम अण्णासाहेब काशीद यांनी गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यास घरामागे टाकण्यात आले.
तो बेशुद्धावस्थेत उषा काशीदच्या घरामागे पडल्याची माहिती मिळाल्यावर भाऊ अरुण कावळे याने त्यास तातडीने कान्हापूर, सिरसाळा येथे खासगी दवाखान्यात नेले. पण डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगून शासकीय दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, सोबत असलेल्या राजाभाऊ बाळासाहेब कावळे व हरिभाऊ रामभाऊ कावळे यांनी तो हृदयविकाराच्या धक्क्याने गेला असावा, शवविच्छेदन करून चिरफाड कशाला करायची, असे म्हणत भावनिक केले. पहाटे तीन वाजता ते मृतदेह गावी घेऊन आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता मारेक-यांनीच अंत्यविधीची घाई करून पुरावा नष्ट केला. सर्व आरोपी फरार आहेत. घटनास्थळी उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी भेट दिली. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेवेळी गावातील एका महिलेने बाळासाहेब कावळेला उषा काशीदच्या घरात जाताना शेवटचे पाहिले होते. त्यानंतर त्याची हत्या झाली. चार दिवस ती भीतीपोटी शांत राहिली. मात्र, नंतर तिने घडला प्रकार अरुण कावळे यास सांगितला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही म्हणून अरुण कावळे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयीन आदेशावरून सात जणांवर खुनाचा गुन्हा नोंदविला.