चार महिन्यांनंतर जाणवला पावसाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:37 IST2019-10-06T23:36:51+5:302019-10-06T23:37:08+5:30
रविवारी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे समाधान व्यक्त होत असून चार महिन्यानंतर आनंदाचे डोही आनंदाचे तरंग जाणवू लागले आहे.

चार महिन्यांनंतर जाणवला पावसाळा
बीड : रविवारी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे समाधान व्यक्त होत असून चार महिन्यानंतर आनंदाचे डोही आनंदाचे तरंग जाणवू लागले आहे. सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते, त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. दुपारपासून जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. गेवराईत दीड तास चांगला पाऊस झाला. धारुर, केज, वडवणी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. शिरुर कासार तालुक्यातील रूप्पुर, गोमळवाडा, वारणी भागात पाऊस झाला. बंडाळ्याच्या ओढ्याला आलेले पाणी सिध्देश्वर बंधाऱ्यात पोहचले. पिंळनेर परिसरातील रिद्धीसिद्धी नदीला पाणी आले, तर मांजरसुंभा, चौसाळा, पालसिंगण परिसरातही चांगला पाऊस झाला.
येल्डा येथे वीज कोसळली
अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा परिसरातील सातपुते वस्तीवर रविवारी कानिकनाथ शंकर सातपुते हे परिसरातील माळावर मेंढ्या चारत होते. त्यासोबतच त्यांच्या मालकीचा घोडाही चरत होता. त्यांच्याच शेजारी भगवान सातपुते यांचीही जनावरे चरण्यासाठी सोडलेली होती. दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान अचानक गरजण्याचा आवाज झाला अंगावरच वीज कोसळल्याने घोडा जागीच ठार झाला. सुदैवाने कानिकनाथ व भगवान हे दोघे घटनेपासून शंभर फूट अंतरावर होते. त्यांच्यासमोर ही वीज कोसळली. विजेच्या धक्क्याने काही क्षण या दोघांच्या डोळ्यांसमोर काळोख झाला. अंधारी गेल्यावर पाहिले तर घोडा मरण पावलेला होता, असे भगवान सातपुते यांनी सांगितले. इतर जनावरे मात्र सुरक्षित राहिली. या घटनेमुळे कानिकनाथ यांचे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती तलाठी व गावच्या सरपंचाना दिली होती. परंतू सायंकाळपर्यंत पंचनामा झालेला नव्हता.
सिद्धेश्वर बंधारा भरला : कापरी नदीला पूर
पाणी टंचाई हे सातत्याचे समिकरण असलेल्या शिरूर शहराला रविवारी आनंदाची वार्ता पावसाने दिली. शहराजवळ असलेला सिध्देश्वर बंधारा भरला तर कापरी नदी देखील भरून गेल्याने चांगला दिलासा मिळाला. रविवारी कालिका देवी मंदिरात अष्टमीचा होमहवन विधी होऊन पुर्णाहुती झाली. त्याचबरोबर बंधारा देखील भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.
गेली वर्षभर टॅकरवर शहर विसंबुन होते सतत पाऊस धरसोड करत होता ,बंधारा आणि मध्यम प्रकल्प यावर्षी भरण्याची आशा धुसर झाली होती. पाणी टंचाई समस्या निर्माण होते किंवा काय अशी शंका वाटू लागली असतानाच रविवारी प्रथमच सिध्देश्वर बंधारा भरल्याने आता सिंदफणा व उथळा मध्यमप्रकल्प देखील भरतील अशी आशा लागली आहे .