बीडमधील चार पालिका, एक न.पं. झाली हागणदारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:18 AM2018-01-22T00:18:03+5:302018-01-22T00:23:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ‘आपले शहर, हागणदारीमुक्त शहर’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, नगर पंचायतींनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘आपले शहर, हागणदारीमुक्त शहर’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, नगर पंचायतींनी कठोर परिश्रम घेतले आहेत. या परिश्रमाला यश आले असून नुकताच केंद्रीय समितीचा अहवाल नगर पालिकेला प्राप्त झाला आहे. यामध्ये बीडसह गेवराई, माजलगाव, परळी या नगर पालिका व पाटोदा नगर पंचायत हागणदारीमुक्त झाल्या आहेत. सर्व मुख्याधिकारी आणि पालिका पदाधिकारी, कर्मचा-यांचे स्वागत होत आहे.
शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने अनेक पाऊले उचलली होती. यामध्ये शौचालये बांधण्याचे आवाहन करण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन अनुदान देणे, तसेच सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन करणे, शहरांमध्ये ओ.डी.एफ.स्पॉट निश्चीत करून त्याठिकाणी अधिकारी, कर्मचाºयांची नियूक्ती करणे, मोबाईलध्ये अॅप तयार करणे, उघड्यावर जाणा-यांवर पोलीस ठाण्यात कारवाई करणे, दंड ठोठावणे आदी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मागील सहा महिन्यांपासून पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, स्वच्छतेचे कर्मचारी, इतर अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतल्यानेच हे शक्य झाल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
बीड नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचाºयांनी परिश्रम घेतले होते. तसेच नागरिकांनी सहकार्य केले, म्हणूनच हे यश मिळू शकले, असे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी सांगितले.
नागरिकांच्या सहकार्यामुळेच यशस्वी
शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतोत. नागरिकांना आवाहन केले जात होते. त्यांनी आम्हाला सहकार्य कले. पालिका अधिकारी, कर्मचा-यांचे परिश्रम आणि नागरिकांच्या सहकार्यामुळेच शहर हागणदारीमुक्त करण्यात यशस्वी झालो.
- हेमंत क्षीरसागर
उपनगराध्यक्ष तथा
स्वच्छता सभापती, बीड न.प.