बीड तालुक्यात उप विभागीय अधिकाऱ्यांसह चार अधिका-यांना कोंडून धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:18 AM2018-05-14T00:18:57+5:302018-05-14T00:18:57+5:30
अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला वाळू माफियांनी कोंडून धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी दुपारी बीड तालुक्यातील औरंगपूर येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपी फरार आहेत.
बीड : अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला वाळू माफियांनी कोंडून धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी दुपारी बीड तालुक्यातील औरंगपूर येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपी फरार आहेत.
बीड तालुक्यातील औरंगपूर परिसरातून जाणाºया सिंदफणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी विकास माने यांना मिळाली. शनिवारी सकाळी ११च्या सुमारास खनिकर्म अधिकारी अनंत पाटील, मंडळ अधिकारी पी. के. राख, तलाठी आसाराम शेळके यांना घेऊन माने वाळू घाटाची पाहणी करण्यासाठी औरंगपूर येथे पोहचले. यशराज वीटभट्टी कारखान्यात या पथकाने वाळू रॉयल्टीच्या पावत्या मागितल्या. यावेळी येथे उपस्थित तिघांनी पावत्या नाहीत, असे सांगत उद्धट वर्तन केले. आपल्यावर कारवाई होणार या भीतीपोटी अनिल पांडुरंग पाटील (कुर्ला) याने इतर लोकांना वीटभट्टीचे प्रवेशद्वार बंद करण्यास सांगितले. परिस्थिती पाहता माने यांनी तत्काळ मोजमाप करण्यासाठी सहाय्यक अभियंता व्ही. टी. डहाळे यांना पाचारण केले. मोजमाप केले असता येथे तब्बल पाऊण कोटी रुपये किंमतीचा ३१४ ब्रास वाळूचा साठा मिळून आला.
पोलीस उप निरीक्षक बालाजी ढगारे, पो. ना. रमेश दुबाले, कैलास ठोंबरे, मनोहर भुतेकर, शेख खय्यूम यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर माने यांच्या फिर्यादीवरुन तिन्ही वाळू माफियांवर कलम ३७९, ३५३, ३४२, ५०४, ३४, गौण खनिज अधिनियम ४७, ४८ अन्वये बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जीवे मारण्याची धमकी; आरोपी फरार
वाळू जप्तीची कारवाई सुरु करताच अनिल पाटीलसह रघुजी पाटील व सुजीत श्यामसुंदर पडुळे या तिघांनी अधिकाºयांना दमदाटी केली. धक्काबुक्की करीत जीवे मारण्याची धमकीही दिली. अधिकाºयांना कोंडून या तिघांनी वाळू साठ्याजवळ असलेला १५ लाख रुपये किंमतीचा जेसीबी (एमएच २३ बी ८१११), ८ लाख रुपये किंमतीचे टिप्पर (एमएच २३ डब्ल्यू २९०९) व ६ लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर अशी तीन वाहने घेऊन पलायन केले. त्यानंतर माने यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी सुटका करुन घेत बीड ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. लवकरच आरोपींना पकडले जाईल असे उप निरीक्षक बालाजी ढगारे यांनी सांगितले.