आवादा कंपनीत चोरी करणारे १० पैकी चौघे पकडले; २७ गुन्हे दाखल टोळीवर मकोका लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:22 IST2025-04-15T18:22:14+5:302025-04-15T18:22:45+5:30
चोरी करणाऱ्या १० जणांमध्ये सात चाेरटे हे धाराशिव जिल्ह्यातील तर तिघे केज तालुक्यातील नांदुरचे आहेत.

आवादा कंपनीत चोरी करणारे १० पैकी चौघे पकडले; २७ गुन्हे दाखल टोळीवर मकोका लागणार
बीड : केज तालुक्यातील मस्साजोग व विडा येथील पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीत लाखो रुपयांची चोरी झाली होती. याप्रकरणात १० आरोपी निष्पन्न करून चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चार गुन्हे उघड झाले असून ११ लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. आता या टोळीवर मकोका लावणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
७ एप्रिल रोजी वीडा येथील आवादा कंपनीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून मारहाण करत ११ लाख रुपयांचे साहित्य चोरी केले होते. त्याआधी ११ मार्च राेजी मस्साजोग येथील प्रकल्पातूनही लाखो रुपयांचे साहित्य चोरी झाले होते. याच ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांना वाल्मीक कराड गँगकडून मारहाण झाली होती. तेव्हापासून ही कंपनीही चर्चेत आली. चोरीच्या सलग दोन घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर हे सर्व गुन्हे धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील टोळीने केल्याचे समोर आले. त्यानंतर या सर्वांना सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एका जीपसह वेगवेगळ्या गुन्ह्यातील ११ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी ही माहिती दिली. यावेळी अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
...अशी आहेत आरोपींची नावे
बबन सरदार शिंदे (वय ४० नांदूर, ता.केज), धनाजी रावजी काळे (वय २३), मोहन हरी काळे (वय ३०) व लालासाहेब सखाराम पवार (वय २६ सर्व रा. वाशी, ता. धाराशिव) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. आणखी सहा जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
टोळीवर २७ गुन्हे
चोरी करणाऱ्या १० जणांमध्ये सात चाेरटे हे धाराशिव जिल्ह्यातील तर तिघे केज तालुक्यातील नांदुरचे आहेत. हे सर्व आरोपी कुख्यात गुन्हेगार आहेत. धाराशिव व बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात २७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
...यांनी केली कारवाई
पाेलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उस्मान शेख, सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, उपनिरीक्षक महेश विघ्ने, हनुमान खेडकर, महेश जोगदंड, भागवत शेलार, तुषार गायकवाड, गणेश मराडे, बप्पासाहेब घोडके यांनी ही कारवाई केली.