भीषण! चार वाहने एकमेकांवर धडकली; दोन जण मृत्यूमुखी, पाच जखमी, बीड बायपासवरील घटना

By सोमनाथ खताळ | Published: July 8, 2024 09:40 PM2024-07-08T21:40:36+5:302024-07-08T21:44:24+5:30

छाेटा हत्ती, रिक्षा, दुचाकी अन् कंटेनरचा अपघात; बबन बाबूराव बहिरवाळ, मोतीराम अभियान तांदळे अशी मृतांची नावे

Four vehicles collided on the bypass; Two killed, five injured, incident on Beed Bypass | भीषण! चार वाहने एकमेकांवर धडकली; दोन जण मृत्यूमुखी, पाच जखमी, बीड बायपासवरील घटना

भीषण! चार वाहने एकमेकांवर धडकली; दोन जण मृत्यूमुखी, पाच जखमी, बीड बायपासवरील घटना

सोमनाथ खताळ, बीड: रस्त्यावर वाहनांची गर्दी असतानाही कोणीच शिस्तीत आणि नियमात वाहने चालवायला तयार नाही. सर्वांनाच गडबड होऊ लागली आहे. याच अतिघाईमुळे छाेटा हत्ती, रिक्षा, दुचाकी अन् कंटेनर ही वाहने एकमेकांवर धडकली. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले, तर पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळच्या सुमारास बीड बायपासवरील महालक्ष्मी चौक परिसरात झाला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

बबन बाबूराव बहिरवाळ (वय ४०, रा. भाळवणी, ता. बीड) व मोतीराम अभियान तांदळे (वय २८, रा. तांदळवाडी, ता. केज) अशी मृतांची नावे असून, अशोक रामभाऊ बहिरवाळ (रा.भाळवणी, ता. बीड) हे जखमी आहेत. इतरांची नावे समजू शकली नाही. सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरून बीड शहरात प्रवेश करताना उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी आवाज उठविल्यानंतरही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. याच चौकात वाहने सुसाट जातात. सोमवारीही बीड शहरातून जाणारी वाहने व महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांमध्ये अपघात झाला.

कंटेनरची धडक ॲपरिक्षाला बसली. तर गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारा छोटा हत्ती वाहनाची दुचाकीला धडक बसली. नंतर हे सर्वच वाहने एकमेकांवर धडकली. यामध्ये दुचाकी व रिक्षात बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. तर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. माहिती समजल्यावर पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी पथकासह धाव घेत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात येऊन मृत व जखमींच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. दरम्यान, पाच जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Four vehicles collided on the bypass; Two killed, five injured, incident on Beed Bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात