चार वर्षांच्या मुलाची घरी राहून कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:35 AM2021-05-27T04:35:36+5:302021-05-27T04:35:36+5:30

पॉझिटिव्ह स्टोरी बीड : कोरोनाला न घाबरता अवघ्या चार वर्षांच्या मुलाने घरी राहून योग्य उपचार घेत कोरोनावर मात केली. ...

A four-year-old boy stays at home and overcomes Corona | चार वर्षांच्या मुलाची घरी राहून कोरोनावर मात

चार वर्षांच्या मुलाची घरी राहून कोरोनावर मात

Next

पॉझिटिव्ह स्टोरी

बीड : कोरोनाला न घाबरता अवघ्या चार वर्षांच्या मुलाने घरी राहून योग्य उपचार घेत कोरोनावर मात केली. आईचे छत्र हरविलेले असल्याने आणि वडिलांनाही कोरोनाची बाधा झालेली असल्याने आत्यानेच या चिमुकल्याची पूर्ण काळजी घेतली. आता हे दोघे बापलेक कोरोनामुक्त झाले आहेत.

बीड तालुक्यातील एका चार वर्षांच्या चिमुकल्याला ताप आला. त्याच्या कुटुंबीयांनी तत्काळ खाजगी रुग्णालय गाठले. तेथे बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी कोरोनाची लक्षणे दिसल्याने तपासणी करण्यास सांगितले. यात हा चिमुकला पॉझिटिव्ह आला. सर्वच लोक घाबरले. त्याला घेऊन जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तेथून डॉ. जानवळे यांच्या निगराणीत त्याला हाेम आयसोलेट करण्यात आले. १६ दिवस त्याने घरीच उपचार घेतले. तोपर्यंत इकडे संपर्कातील लोकांची चाचणी केली असता वडीलही पॉझिटिव्ह आले. अगोदरच आईचे छत्र हरपलेले असल्याने आणि वडीलही पॉझिटिव्ह आल्याने या मुलाची परवड होते की काय, असे वाटत होते. परंतु, आत्याच आई बनून त्याच्यासाठी धावली आणि तो कोरोनामुक्त होईपर्यंत त्याची काळजी घेतली. घरातील इतर सर्व सदस्यांची चाचणी कोरोना निगेटिव्ह आली होती.

नातेवाइकांचा आधार महत्त्वाचा

या कोरोनाबाधित चिमुकल्याला दृष्टी कमी आहे. कोरोनाच्या कठीण काळात रक्ताची नाती दुरावल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, या चिमुकल्यासाठी आत्याने खूप त्याग केला. १६ दिवस त्याची तर काळजी घेतलीच; परंतु, कुटुंबातील इतर सदस्यांना त्याचा संसर्ग होणार नाही, याचीही खूप काळजी घेतली. अशा कठीण प्रसंगात नातेवाइकांचा आधारही कोरोनावर मात करण्यास मदत करीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

हा चिमुकला माझ्याकडे येताच त्याची कोरोना चाचणी करण्यास सांगितले. रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच तो माझ्या निगराणीत होम आयसोलेट होता. या दरम्यान, त्यांना कोरोनाचे सर्व नियम आणि घ्यावयाची काळजी व औषधोपचार समजावून सांगितले. त्यांनी याचे तंतोतंत पालन केले. हा चिमुकला कोरोनामुक्त झाला आहे. मलापण आनंद झाला आहे.

डॉ. संजय जानवळे, बालरोग तज्ज्ञ, बीड

Web Title: A four-year-old boy stays at home and overcomes Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.