शिवसंग्रामचा चौथा सदस्यही भाजपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:47 PM2019-09-05T23:47:41+5:302019-09-05T23:48:26+5:30
जिल्ह्यातील भाजप आणि शिवसंग्राममधील राजकीय वादात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आ. विनायक मेटे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
बीड : जिल्ह्यातील भाजप आणि शिवसंग्राममधील राजकीय वादात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आ. विनायक मेटे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसंग्रामच्या तिकीटावर निवडून आलेले नेकनूरचे जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनी गुरुवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यापुर्वी तीन जि.प.सदस्य भाजपाच्या गळाला लागले होते. उरलेला एकमेव सदस्य देखील भाजपात गेल्यामुळे बीडजिल्हा परिषदेत शिवसंग्रामची सदस्य संख्या चारवरून शुन्यावर आली आहे.
बीड जिल्ह्यात आ.विनायक मेटेंनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी राजकीय वैर लोकसभा निवडणुकीपुर्वीच घेतले होते. यामध्ये महाजनादेश यात्रेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा आक्षेप असताना देखील मुख्यमंत्र्यांनी आ.मेटे यांचा सत्कार स्वीकारला होता. त्यादिवशी झालेल्या वादंगामुळे हा वाद आणखीनच चिघळला होता. महाजनादेश यात्रेच्या जाहीर कार्यक्रमात विनायक मेटे यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा सत्कार करुन पंकजा मुंडेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आ. मेटे यांनी केला होता. त्याला मंत्री पंकजा मुंडेंनी प्रत्युत्तर देत विनायक मेटेंचा उरलेला एकमेव जिल्हा परिषद सदस्य देखील भाजपात घेतला आहे.
नेकनूर जि. प. गटाचे सदस्य भारत काळे यांनी गुरुवारी शिवसंग्रामची साथ सोडत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन बंगल्यावर पार पडला. यावेळी आ. सुरेश धस, राजेंद्र मस्के, विजयकांत मुंडे यांची देखील उपस्थिती होती. या प्रवेशामुळे शिवसंग्राम पक्षाला मुंडे यांनी चांगलाच धक्का दिल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु आहे. यामुळे पुढील काळात आ. विनायक मेटे हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष देखील लागले आहे.
अडीच वर्षातच शिवसंग्रामचे चारही जि.प. सदस्य भाजपात
बीड जिल्हा परिषदमध्ये अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसंग्रामचे ४ सदस्य निवडून आले होते.
यापुर्वीच शिवसंग्रामचे तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी दिली होती.
राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जयश्री मस्के या बीड जि. प. च्या उपाध्यक्ष आहेत.
मस्केंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आ. मेटे यांनी जिल्हा परीषदेच्या सत्तेतून बाहेर पडत पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपसोबत न राहण्याचा निर्णय मेटे यांनी घेतला व राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देण्याची घोषणा केली होती.
त्यानंतर चौसाळा सर्कलचे जि.प.सदस्य अशोक लोढा आणि विडा सर्कल विजयकांत मुंडे या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी यापूर्वीच भाजपात प्रवेश केला होता.
आता उरलेले एकमेव भारत काळे यांनिही भाजपात प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेत शिवसंग्रामचे संख्याबळ शुन्यावर आले आहे.