कोल्ह्यांनी पाडला काळविटाचा फडशा; दहशत मात्र बिबट्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:31 AM2021-02-12T04:31:32+5:302021-02-12T04:31:32+5:30
अंबाजोगाई : शहरालगत साधारण तीन कि.मी. अंतरावर असलेल्या पोखरी शिवारात ७ फेब्रुवारीच्या रात्री बेजगमवार व जाधव ...
अंबाजोगाई : शहरालगत साधारण तीन कि.मी. अंतरावर असलेल्या पोखरी शिवारात ७ फेब्रुवारीच्या रात्री बेजगमवार व जाधव या दोघांच्या शेताच्या बांधालगत एका मोठ्या काळविटाचा फडशा पाडला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हा बिबट्यासदृश प्राणी असल्याचा अंदाज वर्तवला. ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच या विभागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली असता अर्धवट फस्त केलेले काळवीट दिसून आले. याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी भगवान गित्ते व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. वन अधिकारी भगवान गित्ते यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना या परिसरात आढळून आलेल्या पायाच्या ठशांची पाहणी केली. काळवीट फस्त केलेला प्राणी हा बिबट्या आहे की, तरस आहे? अशी शंका उपस्थित झाली. बिबट्या हा प्राण्याची हत्या करताना नरडीचा घोट घेऊन हत्या करतो व तो प्राण्याचे मांस हाडासह खाऊन टाकतो, असे सांगत हा प्राणी तरस असण्याचीच अधिक शक्यता वर्तवली जात होती. या घटनास्थळाजवळच अंगदराव कराड यांच्या शेतात शेततळे आहे. या शेततळ्यावर हा प्राणी पाणी पिण्यासाठी गेला आहे का? याची पाहणी केली असता या शेततळ्याच्या परिसरातही या प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळून आले. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर काळविटाची शिकार बिबट्याने नव्हे, तर कोल्हे अन् रानटी कुत्र्यांनी केल्याचे स्पष्ट झाले. वन विभागानेही याला दुजोरा दिला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.