वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाखाली फसवणूक; बीडमधील विद्यार्थीही ‘मेरिट ब्ल्यू’च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 07:40 PM2022-04-23T19:40:13+5:302022-04-23T19:40:44+5:30
सोशल मीडियात आकर्षक जाहिरातबाजी करून मेरिट ब्ल्यू इंडिया प्रा.लि. या कंपनीने वैद्यकीय महाविद्यालयांतील रिक्त जागांवर प्रवेश मिळवून देण्याचा दावा केला होता.
बीड : नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या ठाण्यातील मेरिट ब्ल्यू इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या जाळ्यात बीडमधील काही विद्यार्थी अडकल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात एका पालकाने २१ एप्रिलला पोलिसांकडे तक्रार केली आहे.
सोशल मीडियात आकर्षक जाहिरातबाजी करून मेरिट ब्ल्यू इंडिया प्रा.लि. या कंपनीने वैद्यकीय महाविद्यालयांतील रिक्त जागांवर प्रवेश मिळवून देण्याचा दावा केला होता. या जाहिरातीला भुलून बीडमधील एका पालकाने ५ मार्चला संपर्क केला. या पालकाच्या पाल्यास नीट परीक्षेत २०१ गुण मिळाले होते. जान्हवी वारिया या महिलेशी त्यांचे बोलणे झाले. ७ मार्च २०२२ रोजी बीडमधील पालकाने ठाणे येथील लोढा सुप्रिमस्, वागळे इस्टेट येथील कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी कंपनीचे संचालक शोभा राठोर व करणसिंग बधोरिया यांनी तासभर समुपदेशन करून तुमच्या मुलास विखे-पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर येथे प्रवेश मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. पाच वर्षांसाठी ६६ ते ७० लाख रुपये एवढे शुल्क लागेल, असेही सांगितले. त्यासंबंधी एक करारपत्र केले.
पहिल्या वर्षासाठी अग्रीम म्हणून त्यांना ५ लाख ४४ हजार रुपये शुल्क भरण्यास सांगितले. ९ मार्चला पालकाने कंपनीच्या नावे या रकमेचा बीड येथील भवानी अर्बन को-ऑप. बँकेचा धनादेश दिला. कंपनीचे यश बँक, महेश बँकेत महेश त्रिपाठी यांच्या नावे खाते असून, त्यात दोन दिवसांनी धनादेश वठला. पुढे १६ एप्रिलला त्यांना विखे-पाटील कॉलेज येथे सकाळी ११ पर्यंत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले गेले. सोबत कॉलेजच्या नावे नऊ लाख रुपयांचा धनाकर्ष (डीडी) आणण्यास सांगितले. मात्र, १५ रोजी त्या सर्वांचे फोन बंद झाले. दरम्यान, या कंपनीवर ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा पहिला गुन्हा १९ एप्रिलला नोंद झाला आहे.
एका पालकाची तक्रार आली आहे. आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, हे पाहावे लागेल. योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
- संतोष वाळके, उपअधीक्षक, बीड
या कंपनीचे ठाण्यात आलिशान कार्यालय आहे. मला जराही शंका आली नाही. माझ्याप्रमाणे अनेकांची फसवणूक झाली असावी, आम्हाला न्याय द्यावा.
- बीड येथील फसवणूक झालेले एक पालक.