टीईटीच्या नावाखाली शिक्षक भरतीची फसवी घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:32 AM2021-07-29T04:32:34+5:302021-07-29T04:32:34+5:30
बीड : शिक्षण मंत्र्यांकडून टीईटीच्या नावाखाली फसवी घोषणा केली जात आहे. ही घोषणा केवळ सरकारची तिजोरी भरण्यासाठी असल्याचा आरोप ...
बीड : शिक्षण मंत्र्यांकडून टीईटीच्या नावाखाली फसवी घोषणा केली जात आहे. ही घोषणा केवळ सरकारची तिजोरी भरण्यासाठी असल्याचा आरोप मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड शिक्षक व कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत बागलाने यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
राज्यात २०१७ साली शिक्षक भरतीसाठी तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टल आणले आणि साडेबारा हजार शिक्षकांची भरती करण्याची वल्गना केली. यातून गेल्या ४ वर्षात केवळ सहा ते सात हजार शिक्षक भरण्यात आले आहेत. त्यातच आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणांचा कहर करून ४० हजारांचा आकडा जाहीर करीत शिक्षक भरतीसाठी आवश्यक शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची घोषणा केली. सध्या ८६ हजारांहून अधिक टीईटी पात्रताधारक नोकरीसाठी वणवण भटकत आहेत. ४० हजार शिक्षक तुम्हाला हवे असतील तर ८६ हजार रांगेत आहेत. मग परीक्षांचा फार्स कशाला राज्यात डी. एड व बी. एड धारक लाखोंच्या संख्येने पडून आहेत. सरकारची ही घोषणा तिजोरी भरण्यासाठी सुरू आहे का असा सवालही जिल्हाध्यक्ष श्रीकांत बागलाने यांनी केला आहे.