शिकार केलेल्या भागात पुन्हा दर्शन; नरभक्षक बिबट्याचे वनविभागाला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 04:05 PM2020-12-01T16:05:17+5:302020-12-01T16:07:26+5:30
मंगळवारी धनगरवाडी शिवारात पथकाने बिबट्याचा माग काढला आहे.
- नितीन कांबळे
कडा ( बीड ) : आठवडा भरापासून तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली आहे. तीन जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याने दोन जणांना गंभीर जखमीसुद्धा केले आहे. जेरबंद करण्यासाठी अनेक पथके कार्यरत असूनही बिबट्या मोकाट आहे. तसेच शिकार केलेल्या भागात बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्याने हे वनविभागाला एक प्रकारे आव्हानच ठरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. यामुळे बिबट्याच्या वाढत्या दहशती पुढे नागरिकांसोबत वनविभाग देखील हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
आष्टी तालुक्यातील सुर्डी, किन्ही, पारगांव जोगेश्वरी या तीन गावात एक पुरूष, एक चिमुकला आणि एका महिलेचा बळी बिबट्याने मागील आठवडाभरात घेतला आहे. तर याच कालावधी पांगुळगव्हाण, मंगरूळ, पारगांव जोगेश्वरी या तीन ठिकाणी हल्ल्यात दोघे गंभीर जखमी आहेत. 24 नोव्हेंबरपासून वनविभागाची पथके बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या अमरावती, पूणे, औरंगाबाद, लातूर, जुन्नर, बीड, नांदेड येथील १७ पथके येथे तैनात आहेत. मात्र, बिबट्याला पकडण्यात जवळपास १२५ कर्मचारी असणाऱ्या पथकांना अद्याप यश आले नाही. उलट शिकार केलेल्या भागात तो पुन्हा दिसत आहे. यामुळे नरभक्षक बिबट्याने वनविभागाला एक प्रकारे आव्हानच दिले असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान, मंगळवारी धनगरवाडी शिवारात पथकाने बिबट्याचा माग काढला आहे. याठिकाणी कोंम्बीग ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.