शिवसेनेच्या वतीने मोफत ५०० बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:24+5:302021-05-05T04:55:24+5:30
बीड : ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय टळावी, यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख ...
बीड : ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय टळावी, यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बीड तालुक्यातील अंथरवणपिंप्री तांडा येथे सर्व सोयींनी अद्ययावत असणारे ५०० बेडचे सुसज्ज असे स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. येथे सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून, काही ठिकाणी तर रुग्णांना बेड मिळत नाही. या सर्व परिस्थितीचा आढावा घेत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने अंथरवणपिंप्री तांडा येथील दिनेश पवार यांच्या आश्रमशाळेत अत्याधुनिक सामग्रीने सुसज्ज असे ५०० बेडचे स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर उभारले आहे. या ठिकाणी रुग्णांवर मोफत उपचार व त्यांची इतर सुविधा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली. तर या सेंटरची पाहणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार व तहसीलदार शिरीष वमने यांनी केली. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख खांडे यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
दरम्यान शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, त्याप्रमाणे दररोजचे जेवण, चहा, पाणी, नाश्ता, फळे वगैरे सर्व वेळेवर देण्यात येणार आहे. तसेच अति गंभीर रुग्णांसाठी २४ तास रुग्णवाहिका कार्यरत असणार आहे. असेदेखील खांडे यांनी सांगितले. स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरच्या जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, तहसीलदार शिरीष वमने, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, जयसिंग चुंगडे, जिल्हा सचिव वैजिनाथ तांदळे, दिनेश पवार, बाबूशेठ लोढा, नगरसेवक शुभम धूत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणेवरील ताण हालका होईल -डॉ. पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार म्हणाले की, कोरोनाच्या या संकटामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पुढाकार घेत कोविड सेंटर उभारण्याचा जो निर्णय घेतला तो अत्यंत कौतुकास्पद आहे. खांडेंच्या या निर्णयामुळे बीड तालुक्यातील ग्रामीण जनतेचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताणदेखील कमी होणार आहे.
===Photopath===
040521\04_2_bed_9_04052021_14.jpg
===Caption===
अंथरवणपिंप्री येथील कोविड सेंटरची माहिती देताना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, तहसीलदार शिरीष वमने, डॉ.आर.बी.पवार व इतर पदाधिकारी दिसत आहेत.