यंदा १ जुलैपर्यंत मिळणार मोफत गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:08 AM2019-06-19T00:08:36+5:302019-06-19T00:09:21+5:30

यंदा १ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे.

Free Uniforms will be available till 1 July this year | यंदा १ जुलैपर्यंत मिळणार मोफत गणवेश

यंदा १ जुलैपर्यंत मिळणार मोफत गणवेश

Next

अनिल भंडारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : समग्र शिक्षा अंतर्गत जिल्ह्यातील १ लाख २४ हजार १७२ विद्यार्थ्यांना शालेय गणवेशासाठी प्रत्येकी ६०० रुपयांप्रमाणे सुमारे ६ कोटी ९५ लाख ८३ हजार २०० रुपयांचा निधी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळा व्यवस्थापन समित्यांकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे यंदा १ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे.
जिल्ह्यात १७ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु झाले. समग्र शिक्षा अंतर्गत २०१९-२० या वर्षातील मोफत शालेय गणवेश योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ तालुक्यातील व बीड यूआरसीमधील पात्र विद्यार्थ्यांसाठी निधी मंजूर झाला होता. प्रती विद्यार्थी दोन गणवेश संचासाठी ६०० रुपये निधी यंदा निश्चित केला आहे. या योजनेंतर्गत सर्व मुली, एससी, एसटी, बीपीएल मुले या योजनेसाठी पात्र आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील ९ हजार ८०६, आष्टीतील १२ हजार ९६०, बीड शहरातील १६ हजार २०३, धारुर तालुक्यात ७ हजार १२०,गेवराई तालुक्यातील १९ हजार ८६४, केजमधील १० हजार ९१, माजलगावातील ११ हजार ७४४, परळी तालुक्यात ९ हजार ६६८, पाटोद्यातील ५ हजार ८२७, शिरुरमधील ६ हजार २०, वडवणी तालुक्यातील ४ हजार ५६१ आणि बीड ग्रामीण भागामधील २०९१ असे १ लाख २४ हजार १७२ पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यात एकूण ८७ हजार ७२९ मुलींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत लाभार्थी विद्यार्थी संख्येची खात्री करुन हा निधी वर्ग करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. हा निधी जिल्हा स्तरावरुन प्राप्त होताच गटशिक्षणाधिकाºयांनी शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. मंजूर केलेल्या तरतुदीची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खर्च करता येणार आहे.
गणवेशाचा रंग, प्रकार, वर्गीकरणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित शाळेच्या व्यवस्थापन समित्यांना देण्यात आलेले असून तालुका किंवा केंद्र स्तरावरुन गणवेश पुरवठ्याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये अशा स्पष्ट सूचना असल्याने बाह्य हस्तक्षेप टळणार आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांच्या वयोगट व मापानुसार मुला- मुलींसाठी गणवेश खरेदी करुन वितरित करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समित्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी देयकाची रक्कम पुरवठादारास धनादेशनेच अदा करावयाची आहे. याबाबतचे अभिलेखे, धनादेशाच्या झेरॉक्स प्रती, संपूर्ण हिशोबाच्या नोंदी, स्टॉक रजिस्टरमध्ये गणवेश वितरण दिनांक तसेच लाभार्थी विद्यार्थी व त्याच्या पालकांची स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा नोंदवावा लागणार आहे. ३० जूनपर्यंत शाळा व्यवस्थापन समित्यांना उपयोगीता प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
गणवेश वितरणात विलंब करु नये असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे ुमख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
दोन दिवस आधीच निधी झाला वर्ग
हा निधी शाळा सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच १५ जून रोजी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आठवडाभरात शाळा व्यवस्थापन समित्यांकडून गणवेश खरेदी होणार आहे. तसेच पात्र विद्यार्थ्यांशिवाय खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लोकसहभागातून गणवेश देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्या व शिक्षणप्रेमी प्रयत्न करत आहेत.
दरवर्षी १५ आॅगस्ट आणि काही शाळांमध्ये त्यानंतरही गणवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत होती.यंदा मात्र शाळा सुरु होताच दोन आठवड्यात विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहेत.

Web Title: Free Uniforms will be available till 1 July this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.