बीडमधील स्वातंत्र्यसैनिक बोगस प्रमाणपत्र प्रकरण; मलेरीया विभागातील सहा कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:48 AM2019-03-06T11:48:33+5:302019-03-06T11:57:04+5:30
या विभागात वर्ग ३ चे सहा कर्मचारी असून त्यांना नोटीस बजावून खुलासे मागविले आहेत.
- सोमनाथ खताळ
बीड : स्वातंत्र्य सैनिक असल्याचे भासवून खोटे प्रमाणपत्र काढत नौकरी बळकावणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवायांचा धडाका सुरू आहे. जिल्हा रूग्णालया पाठोपाठ आता मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. या विभागात वर्ग ३ चे सहा कर्मचारी असून त्यांना नोटीस बजावून खुलासे मागविले आहेत. येत्या तीन दिवसांत त्यांच्यावर बडतर्फच्या कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसतानाही खोटी कागदपत्रांच्या आधारे स्वातंत्र्यसैनिक असल्याचे गौरव पत्र मिळवून त्या आधारे जिल्ह्यातील शेकडो जणांनी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळवल्याचे प्रकरण बीड जिल्ह्यात समोर आले होते. ही बाब शासनाच्या निदर्शनास येताच त्यांनी कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानंतर हे कर्मचारी न्यायालयात गेले. मात्र न्यायालयाने ही बाब गंभीर असून अधिकाऱ्यांनीच आपल्या स्तरावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे जिल्हा रूग्णालयाच्या अस्थापनेवरील वर्ग ३ च्या ३ कर्मचाऱ्यांवर लातुरच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. अशोक माले यांनी आणि वर्ग ४ चे १७ कर्मचारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी बडतर्फ केले होते. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
आता जिल्हा रूग्णालया पाठोपाठ मलेरिया विभागातीलही सहा कर्मचाऱ्यांना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासेही मागविले आहेत. काहींनी खुलासेही दिल्याचे सांगण्यात आले. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांच्यावरही बडतर्फची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
नायगावला झाली बैठक
कारवाईच्या रडारवर असलेल्या कर्मचाऱ्यांची आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नायगाव येथे गोपनिय बैठक झाली आहे. यामध्ये पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात आणि कारवाईपासून बचाव करण्यासाठी काय करायला पाहिजे, याबाबत चांगलीच ‘प्लॅनिंंग’ झाल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.
कारवाईस दिरंगाई का?
आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी न्यायालयाचे आदेश येताच आणि प्रकरण गंभीर असल्याने तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली आहे. मात्र मलेरिया विभागाकडून या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास दिरंगाई का केली जात आहे? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचे नावाखाली कारवाईस उशिर केला जात असल्याचेही आरोग्य विभागातील विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात ‘तडजोड’ झाल्याचीही चर्चा सध्या जोरात सुरू आहे. याला पुर्णविराम देण्याासाठी दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे.
दोन ते तीन दिवसात कारवाई
मलेरिया विभागात सहा कर्मचारी आहेत. त्यांना नोटीस बजावल्या आहेत. काहींनी खुलासेही दिले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत.
डॉ.कमलाकर आंधळे, जिल्हा हिवताप अधिकारी, बीड