उसन्या पैशांवरून दोन गटांत फ्री स्टाईल; पंचायत समिती सदस्यासह ९ जणांवर परस्परविरोधी गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 12:07 PM2022-02-24T12:07:52+5:302022-02-24T12:08:25+5:30
या प्रकरणात पंचायत समिती सदस्य सचिन शेळकेंचा समावेश आहे
बीड: लग्नकार्यासाठी उसने घेतलेल्या ३० हजार रुपयांवरुन तालुक्यातील उमरद जहांगीर येथे २० फेब्रुवारीला कुटुंबे समोरासमोर भिडली. त्यात तलवार, कोयतासारख्या धारदार शस्त्रांचा सर्रास वापर करण्यात आला. परस्परविरोधी तक्रारीवरुन बीड ग्रामीण ठाण्यात ९ जणांवर गुन्हा नोंद असून पंचायत समिती सदस्य सचिन शेळकेंचा यात समावेश आहे.
उमरद जहांगीर येथील मंडप व्यावसायिक विशाल राेहिदास भांबे यांच्या तक्रारीनुसार, २० फेब्रुवारीला जीपमधून (एमएच २३ बीसी- ७७००) आलेल्या लोकांनी सचिन शेळके यांचे उसने घेतलेले ३० हजार रुपये किती दिवस वापरणार, असे म्हणून विशालसह पत्नी, आई, वडील, चुलते यांना मारहाण केली. तसेच गाडीतील तलवार, लोखंडी रॉड काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने विशाल भांबे यांच्या डोक्यात वार केला. सदरील वार हा हातावर लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. गणेश काळे, सदाशिव काळे, सचिन शेळके, विलास आहेर, दीपक आहेर (सर्व रा.उमरद जहांगीर ) व प्रकाश बहिर (रा.बालेपीर ,बीड) यांच्यावर कलम खुनाचा प्रयत्न व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, पं. स. सदस्य सचिन शेळके यांनीही फिर्याद दिली. त्यानुसार, रोहिदास भांबे, विशाल भांबे, ऋषिकेश भांबे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक पवन राजपूत तपास करत आहेत.
उपअधीक्षकांची भेट
या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके, पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी उमरद जहांगीर येथे भेट दिली. दोन्ही गटांतील लोक भांडणात जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.