विद्युत रोहित्रात वारंवार बिघाड - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:13+5:302021-02-23T04:51:13+5:30
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा अनियमित व अचानकच कमी-जास्त दाबाने होत असल्याने रोहित्रामध्ये बिघाड होतो. परिणामी हे बिघडलेले ...
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा अनियमित व अचानकच कमी-जास्त दाबाने होत असल्याने रोहित्रामध्ये बिघाड होतो. परिणामी हे बिघडलेले रोहित्र आठ ते दहा दिवस बदलून मिळत नाहीत. याचा मोठा फटका सिंचनाला बसतो. पिके जोमात आलेली आहेत. त्यांना पाण्याची आवश्यकता असताना रोहित्रात होणारे बिघाड शेतकऱ्यांसाठी घातक ठरू लागले आहेत.
पेट्रोल दरवाढीमुळे वाहनचालकांना त्रास
अंबाजोगाई : पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल पेडगावकर यांनी केली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे पालकांत चिंता
अंबाजोगाई : कोरोनाचा विषाणूंचा प्रादुर्भाव अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज दोन अंकी रुग्णसंख्या वाढत चालली आहे. नुकत्याच इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. महाविद्यालयेही दोन दिवसांपूर्वी सुरू झाली, अशा स्थितीत कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने आपल्या पाल्याला शाळेत पाठवावे की नाही, याबाबत पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने पालकांची चिंताही वाढली आहे.
पाझर तलाव खोलीकरणाची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यातील बर्दापूर, नांदगाव, सुगाव या परिसरात असणारे पाझर तलाव कोरडे पडू लागले आहेत. या तलावांच्या खोलीकरणाची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. शासनाने तलावाचे खोलीकरण व नूतनीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप आडसूळ यांनी केली आहे.
कांदा महागला
अंबाजोगाई : शहरातील येथील भाजीपाला बाजारात सध्या कांद्याचे भाव वाढले आहेत. जुना कांदा ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. बाजारात नवीन कांदा उपलब्ध होत नसल्याने जुन्या कांद्याला चांगला दर आला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मंगळवार व शुक्रवारच्या बाजारात कांद्याच्या दरात वाढ होत आहे. कांदा उत्पादकांना दिलासा मिळत असला तरी ग्राहकांमध्ये मात्र कांदा महाग झाल्याची ओरड सुरू झाली आहे.