खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:39 AM2021-09-24T04:39:35+5:302021-09-24T04:39:35+5:30
बीड : हॉटेल, हातगाड्यांवर खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जात आहे. याच्यावर आळा बसण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून ‘रूको’ (री ...
बीड : हॉटेल, हातगाड्यांवर खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जात आहे. याच्यावर आळा बसण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून ‘रूको’ (री पर्पज युजड कुकिंग ऑईल) नावाची मोहीम राबविली जात आहे. यात आता गती दिली जाणार आहे. तेलाचा वारंवार वापर करणे, तर गुन्हा आहेच परंतु नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. या तेलामुळे कॅन्सर, पोटदुखीचे गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते.
जिल्ह्यात हॉटेल्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अपवादात्मक वगळता बहुतांश हॉटेलमध्ये सुविधा नसतात. स्वच्छतेचा अभाव असतो. तसेच पदार्थही पौष्टिक आहे की नाही, याबाबत शंका असते. अशातच काही हॉटेलमध्ये खाद्यतेलाचा वारंवार वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला तोंड देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पोटदुखी, पोटात भडभड करणे यासारखा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हॉटेलमध्ये गेल्यावर तेलाचा वापर पुन्हा पुन्हा होतो का, याचीही खात्री करण्याची गरज आहे. अन्यथा, पैसे देऊन आपल्याच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
--
नियम काय आहे...
खाद्यतेल वारंवार वापरल्यानंतर त्याची टीपीसी (टोटल पोलार कंपाऊन) ही २५ टक्के पेक्षा जास्त असायला नको. त्यापेक्षा जास्त झाल्यास तेल खराब झाल्याचे निष्पन्न होते.
--
तर सात वर्षांपर्यंत जेलमध्ये जाल...
खाद्यतेलाचा वारंवार वापर केल्याचे तपासणीत सिद्ध झाल्यास हॉटेल चालकावर अन्न सुरक्षा मानदेअंतर्गत परवाना व नोंदणी नियम २०१७ अंतर्गत कारवाई होते. तसेच कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल होतो. यात ६ महिने ते ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
--
आतापर्यंत एकही कारवाई नाही
रूको ही मोहीम मागील वर्षापासून सुरू आहे. दररोज ५० लिटरपेक्षा जास्त तेलाचा वापर असलेले एकही हॉटेल जिल्ह्यात नसल्याचा दावा अन्न प्रशासनाने केला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोणत्याच हॉटेलची तपासणी अथवा कारवाई झालेली नाही. जर कोणी ५० लिटरपेक्षा जास्त तेल वापरत असेल तर अन्न प्रशासनाशी संपर्क करावा, खराब तेलाचीही योग्य पद्धतीने विक्री करून मोबदला घेता येऊ शकतो, असे सहायक आयुक्त इम्रान हाश्मी व अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी यांनी सांगितले.
---
खाद्यतेलाचा वारंवार वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आपल्याकडे जिल्ह्यात आतापर्यंत एकही कारवाई झालेली नाही. सध्या तरी आपल्याकडे टीपीसी काऊंटर मशीन नाही. मशीन येताच तपासणी करून कारवाया केल्या जातील. हॉटेलचालकांनीही संपर्क करून मार्गदर्शन घ्यावे. खराब तेलाचीही विल्हेवाट लावता येते.
इम्रान हाश्मी, सहायक आयुक्त, अन्न प्रशासन
--
खाद्यतेलाचा वारंवार वापर झाल्यास पोटदुखी, पोट धडधड करणे असे आजार होऊ शकतात. वारंवार तेल वापरल्याने त्यातील चवही निघून जाते. पोटासह इतर आजार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. महादेव चिंचाेळे, वैद्यकीय अधीक्षक गेवराई