बहिणीचा खून करून फरार झालेल्या भावासह मित्र अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:34 AM2021-04-27T04:34:38+5:302021-04-27T04:34:38+5:30
केज : पाडव्याच्या सणानिमित्त पुणे येथून केज तालुक्यातील बोरगाव येथे आईला भेटण्यास आलेल्या बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने डोक्यात ...
केज : पाडव्याच्या सणानिमित्त पुणे येथून केज तालुक्यातील बोरगाव येथे आईला भेटण्यास आलेल्या बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने डोक्यात हत्याराने वार करून खून केला होता. त्यानंतर ते दोघे फरार झाले होते. भावासह त्याच्या मित्रास केज पोलिसांनी आठवडा पूर्ण होण्यापूर्वीच उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट येथील शेतातून अटक केली आहे.
केज तालुक्यातील बोरगाव येथे राहत असलेल्या आईस भेटण्यासाठी पुणे येथून शीतल लक्ष्मण चौधरी (वय २८) आल्या होत्या. मयताचा भाऊ दिनकर गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही (रा. बोरगाव) यांनी २० एप्रिल रोजी मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणातून बहिणीचा खून केला होता. दरम्यान, आरोपी भाऊ दिनकर गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर वळेकर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ नानासाहेब जालिंदर गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात दिनकर गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर वळेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दोन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केली होती. आरोपींचा शोध घेत असताना दोन्ही आरोपी उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट येथे शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. केज पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम काळे, दिलीप गीते, वैभव राऊत यांनी बहिणीचा खून करणाऱ्या दिनकर गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर या दोन्ही आरोपींना शेतातून २६ एप्रिल रोजी अटक केली.
...
हत्येचे कारण चौकशीत होणार स्पष्ट
निर्दयीपणे सख्ख्या बहिणीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून का करण्यात आला. हे कारण मात्र अद्याप देखील अस्पष्ट होते. चौकशीदरम्यान खुनाचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.