वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मित्राने केला घात; वीटभट्टी चालकाच्या खूनाचा झाला उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 07:29 PM2021-08-26T19:29:34+5:302021-08-26T19:31:30+5:30
फारुख लतीफ मोमीन (वय ४५, रा. कोठाड गल्ली, अंबाजोगाई) असे त्या मयत वीटभट्टी चालकाचे नाव आहे.
अंबाजोगाई ( बीड ) : शहरातील बेपत्ता झालेल्या वीटभट्टी चालकाचा मृतदेह दोन दिवसानंतर अंबाजोगाई परळी रोडवर वरवटी-पिंपळा शिवारात आढळून आला होता. त्या वीटभट्टी चालकाच्या मित्रानेच वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून अन्य एकाच्या मदतीने त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अवघ्या २४ तासात या खुनाचा मागोवा काढण्यात बर्दापूर पोलिसांना यश आले असून मुख्य आरोपीला रेणापूर येथून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फारुख लतीफ मोमीन (वय ४५, रा. कोठाड गल्ली, अंबाजोगाई) असे त्या मयत वीटभट्टी चालकाचे नाव आहे. फारुख यांची धायगुडा पिंपळा दूरदर्शन केंद्राजवळ वीटभट्टी आहे. रविवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता फारूख हे काही कामानिमित्त घराबाहेर पडले. रात्री ८.३० वा. त्यांच्या मुलीने फोन करून त्यांना जेवण करण्यासाठी बोलावले असता त्यांनी १० मिनिटात येत असे सांगितले. त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तरी ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत. अखेर मंगळवारी (दि.२४) कुटुंबियांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
वाढदिवसाच्या पार्टीला गेल्याची मिळाली माहिती
फारुख यांचा मुलगा मोमीन नाजेश फारुख याने वडिलांचे मित्र शेख अझर आली जाकेर अली यांच्याकडे विचारपूस केली. वरवटी येथील मित्र मारुती उर्फ वाघ्या हनुमंत चाटे (वय ३४, रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फारुख मला घेऊन शेपवाडीजवळील एका ढाब्यावर गेले होते असे अझर यांनी सांगितले. वाढदिवस साजरा करून अझर अंबाजोगाईला परतले तर फारुख, वाघ्या आणि अनोळखी एकजण असे तिघे दुचाकीवरून वरवटीच्या ढाब्यावर जेवणासाठी गेले अशी माहिती अझर यांनी दिली.
गिरवली शिवारात आढळला मृतदेह
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास परळी अंबाजोगाई रोडवर गिरवली शिवारात मुंडे यांच्या शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरून तो फारुख यांचा असल्याची ओळख त्यांच्या मुलाने पटविली. चेहऱ्यावर दुखापत करून आणि शरीरावर मुक्कामार देऊन फारुख यांचा खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले.
पोलिसांचा वेगवान तपास; २४ तासात आरोपी जेरबंद
मृतदेह आढळताच बर्दापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. ठाणे प्रमुख एपीआय रवींद्र शिंदे यांनी पोलिसांचे एक पथक खुनाच्या तपासकामी लावले. पोलिसांनी या घटनाक्रमातील प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली. त्यातून वाघ्या चाटे यानेच खून केल्याच्या निर्णयाप्रत पोलीस पोहोंचले. त्यानंतर एपीआय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी चोपणे, केंद्रे, महादेव आवले, सूर्यवंशी, जमादार यांनी वाघायचा तपास सुरु केला. तो रेणापूर येथे असून फरार होण्याच्या बेतात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी तातडीने रेणापूर गाठले आणि गुरुवारी पहाटे अक्षरशः फिल्मी स्टाईलने रोडवर धावत वाघ्याचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून फारुख यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मोमीन नाजेश फारुख यांच्या फिर्यादीवरून वाघ्या चाटे आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीवर बर्दापूर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, वाघ्या चाटे अद्यापही तोंड उघडत नसल्याने या खुनामागचे कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. वाघ्याला शुक्रवारी (दि.२७) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.