अहमदनगरच्या जेलमध्ये मैत्री; बाहेर येताच बीडमध्ये पोलिस अधिकाऱ्यालाच लुटले, दोघांना बेड्या
By सोमनाथ खताळ | Published: May 31, 2024 01:37 PM2024-05-31T13:37:44+5:302024-05-31T13:39:10+5:30
दोघेही कुख्यात गुन्हेगार असून त्यांना जेल नवे नाहीच
बीड :बीडचा आराेपी हा आर्म ॲक्ट तर अहमदनगरचा आरोपी हा दरोड्याच्या गुन्ह्यात अहमदनगरच्या जेलमध्ये होते. या दोघांचीही जेलमध्येच मैत्री झाली. जामिनावर दोघेही बाहेर आले. नगरचा आरोपी बीडच्या मित्राला भेटायला आला. चार तास दारू ढोसून घरी जाताना त्यांनी पोलिस निरीक्षकाला लुटले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांनाही बेड्या ठाेकल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.
सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान (वय २६ रा. पिंपगव्हाण रोड, बीड) व स्वप्निल उर्फ आदित्य उर्फ सोपान अशोक पाखरे (वय २५ रा. भिंगार कॅम्प, अहमदनगर) अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. दोघेही सराईत आहेत. छोट्या हा गावठी कट्टे विक्री करतो तर स्वप्निलविरोधात दराेड्याचे गुन्हे दाखल आहेत. हे दोघेही साधारण तीन, चार महिन्यांपूर्वी अहमदनगरच्या जेलमध्ये एकत्र होते. येथेच ओळख आणि मैत्री झाली. जामिनावर बाहेर येताच त्यांनी संपर्क साधला. छोट्याने स्वप्निलला बीडला बोलावले. मस्त ओली पार्टी दिली. त्यानंतर घरी जाताना त्यांना एसपी ऑफिसच्या मागील बाजूस एक व्यक्ती एकटाच दिसला. त्यांनी अडवून हातातील दोन अंगठ्या, रोख रक्कम असा ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले होते. ही घटना ५ मे रोजी घडली होती. ज्यांची लुटमार झाली ते सामान्य नागरिक नसून पोलिस निरीक्षक होते. कृष्णा उत्तमराव हिस्वनकर (वय ५६ रा.शहानुरवाडी, छत्रपती संभाजीनगर ह.मु. बिंदुसरा पोलिस अधिकारी कॉलनी, बीड) असे त्यांचे नाव होते. लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी ते बीडला आले होते.
दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यालाच लुटल्याने पोलिसांचा वचक आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु स्थानिक गुन्हे शाखेने याच्या तपासाची चक्रे गतीने फिरवली. त्यांनी २० दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावत दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांना बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, हवालदार मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, विकी सुरवसे, सुनील राठोड, संजय जायभाये आदींनी केली.
दोघेही कुख्यात, त्यांना जेल नवे नाहीच
छोट्यावर बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्टे विक्री, जवळ बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. तर स्वप्निल हा देखील दरोडा, घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे करतो. दोघांवरही २० पेक्षा अधिक गुन्हे आहेत. दोघेही सराईत आहेत. पोलिसांनी पकडले की जेलमध्ये जायचे आणि जामिनावर बाहेर आल्यावर लगेच गुन्हे करायचे, अशी त्यांची मोडस आहे. त्यांच्यासाठी जेल नव्हे नाही.