बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:01 AM2018-08-05T00:01:48+5:302018-08-05T00:02:42+5:30
मराठा साप सोडणारे नाही तर लढणारे आहेत. ज्यांनी वेठीस धरले, त्यांना पंढरपुरात येऊ नका म्हणालो. मराठ्यांनी ठरवलं तर मुख्यमंत्र्यांना फिरता आलं नाही, हे आता सरकारच्या लक्षात आलं. मस्तीत आलेले हे सरकार आहे, मस्ती कशी जिरवायची हे मराठ्यांना माहीत आहे. आम्ही मराठा ‘समुद्र’ आहोत, खवळण्याचा प्रयत्न करू नका. मराठा खवळला तर त्सुनामी येईल, असा इशारा प्रा. सत्येंद्र पाटील यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मराठा साप सोडणारे नाही तर लढणारे आहेत. ज्यांनी वेठीस धरले, त्यांना पंढरपुरात येऊ नका म्हणालो. मराठ्यांनी ठरवलं तर मुख्यमंत्र्यांना फिरता आलं नाही, हे आता सरकारच्या लक्षात आलं. मस्तीत आलेले हे सरकार आहे, मस्ती कशी जिरवायची हे मराठ्यांना माहीत आहे. आम्ही मराठा ‘समुद्र’ आहोत, खवळण्याचा प्रयत्न करू नका. मराठा खवळला तर त्सुनामी येईल, असा इशारा प्रा. सत्येंद्र पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी शनिवारी बीड जिल्हा सकळ मराठा शिक्षक व प्राध्यापक समन्वय समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याप्रसंगी पाटील बोलत होते. नियोजनाप्रमाणे मल्टीपर्पज मैदानावर जिल्हाभरातून शिक्षक, प्राध्यापक एकत्रित जमले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिजाऊ वंदनेनंतर शिस्तबध्दपणे घोषणा देत मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या शिक्षक, प्राध्यापकांच्या हाती विविध मागण्यांचे फलक होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर भाषणे झाली व आंदोलनाचे नियोजन सांगितले.
महिला प्रतिनिधी म्हणून प्रा. संगीता शिंदे म्हणाल्या, आत्महत्याग्रस्त तरुणांच्या कुटुंबाचा विचार व्हावा. शासनाने आरक्षणाबाबत ठोस भूमिका जाहीर करावी. मराठा गुणवंत मुलांच्या भविष्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
सोमवारी महिला क्रांती मोर्चा
६ आॅगस्ट रोजी मराठा महिला क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता मल्टीपर्पज मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यात फक्त महिलांचाच सहभाग राहणार आहे. तर ९ आॅगस्ट क्रांती दिनी जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
मंगळवारी रक्तदान आंदोलन
आम्ही रक्तदान करू शकतो आणि वेळ पडली तर रक्त सांडू शकतो हा इशारा देत ७ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पाच हजार बॅग रक्तदान करण्याचा निश्चय जाहीर करण्यात आला. जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे.
शांतता राखा, जागे रहा
५८ मोर्चे जगाला दिशा देणारे ठरले. मोर्चा, चर्चा, धरणे धरली, रक्ताच्या सह्यांचे निवेदन दिले, रास्ता रोको केला. आता तर जलसमाधीपर्यंत आंदोलन पेटले आहे. एवढे करून केवळ वेळकाढूपणा आणि पोकळ आश्वासने मिळाली. मागून देत नसाल तर हे होणार आहे. डोकं भडकलं नाही, सरकारने डोकं भडकवलंय. आम्ही मराठे आहोत, मरेंगे मगर हटेंगे नही. समुद्र शांत आहे. आमची मागणी रास्त आहे. आततायीपणाची नाही. मूकमोर्चाने काही झाले नाही, म्हणून परळीत ठोक मोर्चा काढला. आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. तरूणांनी शांतता राखावी. जागे रहा. आत्महत्या करू नका असे आवाहन प्रा. सत्येंद्र पाटील यांनी भाषणात केले.
माजलगावमध्ये युवकांचे मुंडण
माजलगाव : मराठा आरक्षणासाठी येथील तहसील कार्यालयासमोर चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनास आ.आर.टी.देशमुख यांनी भेट दिली. सादोळा येथील १६ युवकांनी आंदोलनस्थळी मुंडण करीत सरकारचा निषेध केला. किराणा,सराफा व्यापारी असोसिएन,राजमुद्रा ग्रुप, शिवसंग्रामसह मजूर सहकारी संस्थेने या आंदोलनाला पाठिंबा दिला.
परळीतील आंदोलनाचा १८ वा दिवस
परळी : येथील तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन अठराव्या दिवशीही सुरु होते. हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार राज्यसमन्वयक आबासाहेब पाटील यांनी केला. दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरव खेडेकर यांनी ठिय्या आंदोलनास भेट दिली.
मोटारसायकल रॅली, मारुतीला जलाभिषेक
बीड तालुक्यातील पिंपळनेर, नाळवंडी, वडवणी येथून शेकडो मराठा युवकांनी बीड ते परळी दुचाकी रॅली काढली. रॅलीचे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी व परळीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तसेच परळी तालुक्यातील रामेवाडी (कासारवाडी) येथील शिवक्रांती युवा संघटना व मित्र मंडळाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारला सुबुध्दी लाभावी यासाठी मारुती मंदिरात जलाभिषेक करून हनुमानास साकडे घातल्याचे सांगण्यात आले.
केजमध्ये दुसऱ्या दिवशी ठिय्या सुरूच
केज : आरक्षणाच्या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचे दुसºया दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच आहे. केज तालुका वकील संघ या आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे अॅड. सुंदर तपसे, अॅड. चाळक म्हणाले. तर आ. प्रा. संगीता ठोंबरे तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
गेवराईत ठिय्या आंदोलन
गेवराई : सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शुक्रवारपासून सुरु झालेले बेमुदत ठिय्या आंदोलन शनिवारी दुसºया दिवशी सुरूच होते. यात ज्येष्ठांसह तरूणांचा सहभाग असून, ग्रामीण भागातूनही आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणासाठी धोंडेंचे आंदोलन
आष्टी : मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आ. भीमराव धोंडे हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आष्टी तहसीलसमोर रविवारी दुपारी ठिय्या आंदोलन करणार आहेत. भाजपाचे आष्टी तालुकाध्यक्ष अॅड. हनुमंत थोरवे व तालुका सरचिटणीस शंकर देशमुख यांनी ही माहिती दिली.