भिडेवाडा समर्थनार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:35 AM2018-10-09T00:35:15+5:302018-10-09T00:35:55+5:30
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात सुरू करुन बहुजन समाजातील मुली व स्त्रियांना ज्ञान देण्याचे महान कार्य सुरु केले होते. तो भिडेवाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या भिडेवाड्यास शासनाने जागतिक दर्जाचे स्मारक घोषित करावे, या मागणीसाठी सोमवारी परळीत भिडेवाडा बचाव समन्वयक समितीच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात सुरू करुन बहुजन समाजातील मुली व स्त्रियांना ज्ञान देण्याचे महान कार्य सुरु केले होते. तो भिडेवाडा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या भिडेवाड्यास शासनाने जागतिक दर्जाचे स्मारक घोषित करावे, या मागणीसाठी सोमवारी परळीत भिडेवाडा बचाव समन्वयक समितीच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
श्री संत सावता माळी महाराज मंदिर येथून सकाळी १०.३० वाजता निघालेल्या मोर्चाने व भिडेवाडा बचावच्या घोषणेने परळी शहर दणाणून गेले होते. मोर्चा राणी लक्ष्मीबाई टॉवर, मोंढा, स्टेशनरोड, शिवाजी चौकमार्गे तहसीलवर धडकला.
तहसील कार्यालयावरील या मोर्चातून शांतता व स्वच्छतेचा संदेश दिला. ढोल ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या घोषणाबाजीने परळी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांनी आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदाराला दिले.
शहरातील मुख्य मार्गावरुन निघाला मोर्चा
परळी शहरात भिडेवाडा बचाव समन्वयक समितीचे वतीने काढण्यात आलेला मोर्चा शहरातील श्री संत सावता माळी महाराज मंदिरापासून सकाळी १०.३० वाजता निघाला. यावेळी बहुसंख्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
भिडेवाडा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने या भिडेवाड्यास राज्य शासनाने जागतिक दर्जाचे स्मारक घोषित करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी करुन जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा मुख्य मार्गावरुन तहसील कार्यालयावर धडकला.