अंबाजोगाईत वैद्यकीय प्रवेशातील अन्यायाविरोधात निघाला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 06:52 PM2019-07-01T18:52:50+5:302019-07-01T18:54:23+5:30
एक विद्यापीठ एक गुणवत्ता यादी या तत्वाने ७०:३० आरक्षण तात्काळ रद्द करा
अंबाजोगाई (बीड ) : वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ सोमवारी (दि.१ ) शहरातून विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले.
महाराष्ट्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी घटनाबाह्य प्रादेशिक आरक्षण ७०:३० पद्धतीने करण्यात येते. यासाठी उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशी विभागणी केलेली आहे. या प्रक्रियेमुळे मराठवाडयावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. मराठवाडयातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेशाच्या अत्यंत कमी जागा शिल्लक राहतात. तर उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७० टक्के आरक्षित अशा १३८६. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात ८१५ अशा एकूण २२०१ जागा उपलब्ध आहेत. या तुलनेत मराठवाडयात शासकीय ३८७ व खाजगी ६० अशा एकूण ४४७ जागा उपलब्ध आहेत.
मराठवाडयातील सर्व जातींमध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उर्वरित महाराष्ट्र व विदर्भातील ७० टक्के जागांवर प्रवेश मिळत नाही. त्यामुळे जास्त गुण असूनही वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही. यासाठी मूळ ७०:३० आरक्षणाचे तत्व विद्यापिठांच्या अंतर्गत प्रभागांना लागू होते. परंतु वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एकच नाशिक येथील आरोग्य विद्यापीठ असल्यामुळे प्रादेशिक आरक्षण लागू करणे अन्यायकारक आहे. यासाठी एक विद्यापीठ एक गुणवत्ता यादी या तत्वाने ७०:३० आरक्षण तात्काळ रद्द करून सन २०१९ च्या प्रवेश प्रक्रियेत मराठवाडयातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्याना न्याय द्यावा, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.
या मोर्चात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, प्रा. नानासाहेब गाठाळ, कॉ. बब्रुवाहन पोटभरे, शेख रहिम, प्रा. सुभाष धुळे, नमिता मुंदडा, डॉ. नरेंद्र काळे, पंचायत समितीच्या सभापती मीना भताने, महादेव मस्के, यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध संघटना व विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.