"... तर ओबीसींचं आरक्षण संपून जाईल"; जरांगेंवर निशाणा, भुजबळांचे सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 05:58 PM2023-11-06T17:58:54+5:302023-11-06T18:41:45+5:30
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरे-तुरेच्या भाषेत बोलायचं हे योग्य आहे का, असे म्हणत भुजबळांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला.
संभाजीनगर/मुंबई - मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, कुणबी प्रमाणपत्रासह मराठा समाजाचा इतर मागास वर्गात समावेश होत असून या आरक्षणाला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. तसेच, मनोज जरांगे पाटील यांच्यावरही निशाणा साधला.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आरे-तुरेच्या भाषेत बोलायचं हे योग्य आहे का, असे म्हणत भुजबळांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला. आंदोलनावेळी ज्यांनी काही नेत्यांची घरं जाळली, जाळपोळ केली ती माणसं आमची नाहीत, असं जरांगे म्हणत होते. मग, जर ती माणसं तुमची नाहीत, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर ते मागे घेण्याची मागणी तुम्ही का करताय, असा सवालही भुजबळांनी विचारला. तसेच, जरांगेंच्या सभेसाठी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. मग, आंदोलनादरम्यान, जाळपोळीत ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांनाही नुकसान भरपाई सरकार देणार का, असा सवाल भुजबळ यांनी विचारला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास छगन भुजबळ यांनी थेट विरोध केला आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मराठा समाजाला सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावं, मात्र ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करु नये. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देणं चुकीचं आहे, अशाने ओबीसींचं संपूर्ण आरक्षण संपून जाईल, अशी चिंता भुजबळांनी व्यक्त केली. तसेच, लेकरंबाळं सर्वच जातींमध्ये आहेत, अशी भावनिक सादही त्यांनी घातली. महाराष्ट्र हा मराठींचा आहे, मराठ्यांचा नव्हे, असे यशवंतराव चव्हाण यांनी म्हटलं होतं, असा दाखलाही भुजबळ यांनी दिला.
दरम्यान, ओबीसी समाजाला कमी लेखू नका, असे म्हणत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जरांगे पाटलांना शुभेच्छा
आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे. ७० वर्षांच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले असून अजूनही समाज मागासच आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण सरसकट ओबीसीतून नको, तर स्वतंत्र आरक्षण द्या, असा एल्गार ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ते आज सकाळी छत्रपती संभाजीनगरहून -बीडकडे जात असताना अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वडीगोद्री येथे बोलत होते. भुजबळांनी छत्रपती संभाजीनगर येथे असून मनोज जरांगे यांची भेट टाळली. तसेच, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही ते म्हणाले.