खुंटेफळ साठवण तलावासाठी भूसंपादन व पुनर्वसन तातडीने करून निधी उपलब्ध करून द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:58+5:302021-06-19T04:22:58+5:30

बाळासाहेब आजबे यांची जलसंपदा मंत्र्यांकडे आग्रही मागणी आष्टी : तालुक्यासाठी महत्त्वाचा ठरणारा खुंटेफळ साठवण तलावाचे काम सुरू करण्यासाठी शासनाने ...

Funds should be made available for land acquisition and rehabilitation for Khuntephal storage pond immediately | खुंटेफळ साठवण तलावासाठी भूसंपादन व पुनर्वसन तातडीने करून निधी उपलब्ध करून द्यावा

खुंटेफळ साठवण तलावासाठी भूसंपादन व पुनर्वसन तातडीने करून निधी उपलब्ध करून द्यावा

Next

बाळासाहेब आजबे यांची जलसंपदा मंत्र्यांकडे आग्रही मागणी

आष्टी : तालुक्यासाठी महत्त्वाचा ठरणारा खुंटेफळ साठवण तलावाचे काम सुरू करण्यासाठी शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हे काम होईल; परंतु त्या अगोदर या ठिकाणी भूसंपादन व पुनर्वसन तातडीने करून आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आ. बाळासाहेब आजबे यांनी केली आहे.

१७ जून रोजी जयंत पाटील, धनंजय मुंडे व वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत आष्टी मतदार संघाचे आ. बाळासाहेब आजबे यांची मतदार संघातील जलसंपदा विभागाच्या विविध योजना व आष्टी तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजना व शिरूर तालुक्यातील सिंदफणा मध्यम प्रकल्पाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये आ. आजबे यांनी खुंटेफळ साठवण तलावासाठी लवकरात लवकर भूसंपादन करून पुनर्वसन करावे व या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. पेडगाव येथे भरपावसाळ्यातही पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळणे शक्य होणार नाही.

या योजनेत दोन ठिकाणी लिफ्ट असून, हे पाणी पाटाने व बोगद्यातून येणार असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होणार आहे. त्यामुळे या योजनेचा म्हणावा असा फायदा आष्टी मतदार संघाला होत नाही. त्याऐवजी पेडगावपासून खाली ३५ किलोमीटर अंतरावर शिंपोरा येथून ही योजना राबवल्यास या ठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने हक्काचे पाणी मिळेल व ते पाणी पाइपलाइनद्वारे थेट खुंटेफळ साठवण तलावात आणता येईल. त्यामुळे पाण्याची गळती थांबेल. हे मुद्दे आ. आजबे यांनी जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, खुंटेफळ साठवण तलावासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून लवकरच काम सुरू करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. शिरूर तालुक्यातील सिंदफणा मध्यम प्रकल्पासाठी प्रकल्पाचे सर्वेक्षण करून पीडीएनसाठी प्रस्तावित करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. आष्टी मतदार संघासाठी जलसंपदा विभागाकडून विविध योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Funds should be made available for land acquisition and rehabilitation for Khuntephal storage pond immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.