माजलगावात दीड महिन्यात १०९ कोरोना बळींवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:34 AM2021-05-18T04:34:27+5:302021-05-18T04:34:27+5:30
माजलगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच मृतांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील दीड ...
माजलगाव : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच मृतांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील दीड महिन्याच्या काळात कोरोनाने मृत झालेल्या १०९ बळींवर माजलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ६० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मागील कालावधीच्या तुलनेत यंदा कोरोनाची दाहकता तीव्र असल्याचे यावरून दिसून येते.
गतवर्षी मार्चपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी बाधित आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होती. तसेच मृतांची संख्यादेखील कमी होती. पहिल्या लाटेत ३-४ महिन्यात माजलगाव शहरात उपचार घेणाऱ्यांमध्ये केवळ ६० रुग्णांचा मृत्यू झाला होता. या सर्वांवर माजलगाव येथील मंगलनाथ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या कोरोना लाटेत पॉझिटिव्ह येणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली पहावयास मिळत आहे.
पहिल्या लाटेत नागरिकांना माजलगाव शहरात केवळ एक ते दोन ठिकाणी उपचार मिळत होते. परंतु यावेळी दहा ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. उलट यावेळी मराठवाड्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत आहेत. यामुळे या ठिकाणचा मृतांच्या आकड्यात वाढ होऊन ती दीड महिन्यात १०९वर गेली आहे.
मार्च महिन्यात केवळ एकच मृत्यू होता. एप्रिलमध्ये ४८, तर १५ मेपर्यंत ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पथक प्रमुख संतोष घाडगे यांनी दिली. तर या ठिकाणी अंत्यविधी करणारा नगरपरिषदेचा एक कर्मचारी पॉझिटिव्ह असून, दुसरा आजारी असल्याने मागील ५-६ दिवसांपासून पथक प्रमुख संतोष घाडगे व सागर उजगरे हे दोनच कर्मचारी या रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत. रविवारी शहरात सहा जणांचा मृत्यू झाल्याने मृतदेह बांधण्यापासून ते अंत्यविधी करण्यापर्यंतचे काम हे दोघेच करत आहेत.
पहिल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांत भीतीचे वातावरण होते तसेच आपण पॉझिटिव्ह आहोत असे गावात कळल्यास आपली बदनामी होईल यामुळे अनेकजण औरंगाबाद, पुणे, लातुर आदी ठिकाणी जाऊन तेथेच कोरोनाची टेस्ट करत होते. यामुळे पहिल्या लाटेत बाहेरगावातील रुग्णालयात उपचारादरम्यान अनेकांचे मृत्यू झाले होते. त्यांच्यावर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हा आकडाही कमालीचा होता.
===Photopath===
170521\purusttam karva_img-20210516-wa0044_14.jpg