२६ दिवसांत ४२ कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:34 AM2021-05-21T04:34:49+5:302021-05-21T04:34:49+5:30
सखाराम शिंद गेवराई : तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, येथील कोविड केअर सेंटरदेखील ...
सखाराम शिंद
गेवराई : तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, येथील कोविड केअर सेंटरदेखील फुल्ल झाले आहेत. उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांवर नगरपरिषदेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येतात. ११ एप्रिलपासून ते १८ मे या २६ दिवसांत तालुक्यातील ४२ कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
कोरोनाबाधित मृतांवर येथील डंपिंग ग्राऊंडजवळ नगरपरिषदेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, तसेच मोजकेच नातेवाईक दूरवरून अंत्यसंस्कारास उपस्थित राहत असल्याचे येथील नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक भागवत येवले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचे रुग्ण शहरात कमी, तर ग्रामीण भागात जास्त प्रमाणात आढळत आहेत. हा आकडा दररोज मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. मागील २६ दिवसांत कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन न करता येथील नगरपरिषदेच्या वतीने पांढरवाडी रोडवरील डंपिंग ग्राऊंडच्या बाजूला असलेल्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच येथील रुग्णालयातून मृतदेह रुग्णवाहिकेतून आणणे, चिता रचणे, अंत्यसंस्कार करण्यापर्यंत सर्व कामे येथील नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक भागवत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नगरपरिषदेचे कर्मचारी राम सुतार, विष्णू सुतार हे करीत आहेत. तसेच काही दिवशी तीन ते चारजणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे येवले यांनी सांगितले.
===Photopath===
200521\20bed_12_20052021_14.jpg