जवान महेश तिडके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 12:13 AM2020-01-03T00:13:03+5:302020-01-03T00:17:11+5:30
येथून जवळच असलेल्या लाडझरी (ता. परळी) येथील सैनिक महेश यशवंत तिडके (वय २३) यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात २ रोजी सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान तिडके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उलटली होती.
नृसिंह सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटनांदूर : येथून जवळच असलेल्या लाडझरी (ता. परळी) येथील सैनिक महेश यशवंत तिडके (वय २३) यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात २ रोजी सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान तिडके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी उलटली होती.
महेश तिडके हे भटिंडा (पंजाब) येथे सैन्यात टेक्निशियन या पदावर कार्यरत होते. ड्युटी संपवून घरी मोटारसायकलवरून परतत असताना १९ डिसेंबर रोजी दाट धुक्यात त्यांना कारने धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना सैन्यादलातील दवाखान्यात दाखल करण्यात आले. २७ रोजी ते कोमात गेले व अखेर ३० डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. २०१६ मध्ये सैन्यात भरती झाले होते. अंत्यसंस्कारापूर्वी महेश यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जि.प. शाळेच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. दर्शनासाठी या ठिकाणी अलोट गर्दी उलटली होती.
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी शोकसंदेश पाठवून आपल्या संवेदना प्रकट केल्या. शासनाच्या वतीने परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, तहसीलदार पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, तलाठी रेश्मा गुणाले, ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली. माजी मंत्री पंडितराव दौंड, परळी पं.स. सभापती बबनराव गित्ते, शिवाजी गुट्टे यांनी अंत्यदर्शन घेऊन संवेदना व्यक्त केल्या.
सैन्याचे बाळकडू घरातूनच
महेश तिडके यांचे वडील सैन्यात होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत तर त्यांचे मोठे बंधू राहुल यशवंत तिडके हे सुध्दा सैन्यात असून, ते श्रीनगर येथे कार्यरत आहेत.
घरातील सैनिकांची पार्श्वभूमी पाहता महेश यांनी आर्मीत भरती होण्यासाठी कठोर मेहनत घेतली होती. दहावीनंतर पॉलिटेक्निक करून ते सैन्यात भरती झाले होते.