लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By संजय तिपाले | Published: August 15, 2022 06:05 PM2022-08-15T18:05:41+5:302022-08-15T18:06:15+5:30

मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे विनायक मेटे यांचे आरक्षण प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीला जातानाच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले.

Funeral of Vinayak Mete with state honors, merges in panchatva | लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लोक'नायका'ला साश्रूनयनांनी निरोप; विनायक मेटे पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

googlenewsNext

बीड - शिवसंग्रामचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्यावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना जड अंतःकरणाने साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. पुत्र आशितोष मेटे यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. लोक'नायका'ला निरोप देण्यासाठी पावसाच्या सरी कोसळत असतानाही हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. शोकभावना व्यक्त करताना अनेक मान्यवरांना गहिवरून आले.

मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे विनायक मेटे यांचे आरक्षण प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीला जातानाच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने बीडवर शोककळा पसरली आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले व मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे लढाऊ बाण्याचे नेतृत्व म्हणून विनायक मेटे यांची ओळख होती.  शिवसंग्रामची स्थापना करूनत्यांनी राज्यभर संघटन बांधणी केली. एक वादळी नेते म्हणून त्यांनी विधानपरिषदेत पाचवेळा सदस्यपद भूषवून कर्तृत्व गाजविले. 

शिवसंग्राम भवन येथून दुपारी एक वाजता निघालेली अंत्ययात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून कॅनॉल रोडवरील रामदेव बाबा मैदानावर पाहोचली. हजारोंच्या उपस्थितीत विनायक मेटे यांना अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, डॉ. तानाजी सावंत,चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. धनंजय मुंडे, संजय दौंड, संदीप क्षीरसागर, लक्ष्मण पवार, बाळासाहेब आजबे, सुरेश धस, नमिता मुंदडा, सुमनताई पाटील, श्वेता महाले,रत्नाकर गुट्टे, भीमराव केराम, भारती लव्हेकर, नारायण कुचेकर,राणा जगजितसिंह, अभिमन्यू पवार, संजय सिरसाट, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी मंत्री पंकजा मुंडे,  सदाभाऊ खोत, अर्जुन खोतकर, जयदत्त क्षीरसागर, प्रा. सुरेश नवले,अशोक पाटील,बदामराव पंडित, माजी आमदार राजेंद्र जगताप, सिरजोद्दीन देशमुख, साहेबराव दरेकर,जनार्धन तुपे, सय्यद सलीम, अमरसिंह पंडित, प्रा. सुनील धांडे, भीमराव धोंडे, वस्त्रोद्योग मंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी  राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जि. प. सीईओ अजित पवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी,विविध ठिकाणाहून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वस्तरातील नागरिकांची उपस्थिती होती.

हवेत फैरी झाडून मानवंदना
विनायक मेटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत तीन फैरी झाडून विनायक मेटे आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाला मंत्रोच्चारात भडाग्नी देण्यात आला. यावेळी मेटे साहेब अमर रहे... अशा गगनभेदी घोषणा दिल्या गेल्या.

Web Title: Funeral of Vinayak Mete with state honors, merges in panchatva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.