रो-हाउसमध्ये जुगार अड्डा; पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:04+5:302021-04-13T04:32:04+5:30
बीड : लॉकडाऊन काळात जुगार खेळण्याचे प्रकार प्रचंड वाढले असून, पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी बीड ...
बीड : लॉकडाऊन काळात जुगार खेळण्याचे प्रकार प्रचंड वाढले असून, पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. दोन दिवसांपूर्वी बीड ग्रामीण पोलिसांनी शिदोड शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला, रविवारी एसपींच्या पथकाने चऱ्हाटा रोडवरील वैष्णवीनगर येथील एका रो-हाउसमध्ये सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर छापा टाकून तब्बल दोन लाख सात हजार ८३० रुपयांच्या मुद्देमालासह जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चर्हाटा रोडवरील वैष्णवीनगर येथील एका रो-हाउसमध्ये हा जुगार खेळला जात होता. याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी छापा टाकून जुगार खेळताना आदिनाथ सूर्यभान कोठेकर, सिद्धेश्वर अरुण हिंगमिरे, विकास विष्णू काळे, उद्धव अभिमान घोलप, सुहास बाबासाहेब मुंजाळ या जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून नगदी ३३ हजार ८३० रुपये, मोबाइल, दुचाकी, चारचाकी असा एकूण दोन लाख सात हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांचे पथकप्रमुख सपोनि विलास हजारे, सादिक पठाण, बाष्टेवाड, राऊत, भिल्लारे, मोरे यांनी केली.
पोलीस ठाण्यांचे दुर्लक्ष
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात एकत्र येत मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात आहे. त्याकडे संबंधित पोलीस ठाण्यांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून, माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक ग्रामीण भागातील जुगार अड्ड्यांवरदेखील कारवाया करणार असल्याचे सपोनि विलास हजारे यांनी सांगितले.