बीडच्या क्रीडा कार्यालयातील मैदानावर फुकटात ‘खेळ’ सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:26 PM2019-07-15T12:26:42+5:302019-07-15T12:31:18+5:30
भाडे न देणाऱ्यांकडे अधिकाऱ्यांची डोळेझाक
बीड : जिल्हा क्रीडा संकुलाचा फुकटात वापर करून दुकानदारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील अनेक वर्षांपासून ही दुकानदारी जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे या लोकांचे अधिकाऱ्यांसोबत वादही झाले. तरीही अधिकाऱ्यांनी यावर कसलीच कारवाई केली नाही. त्यामुळे या लोकांकडे अधिकाऱ्यांची डोळेझाक होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल आहे. अगोदरच संकुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. त्यातच आहे त्या मैदानावर आणि काही हॉलमध्ये काही लोकांनी हक्क गाजविला आहे. याबाबत ‘लोकमत’ने काही महिन्यांपूर्वी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर तत्कालिन अधिकाऱ्यांनी या सर्वांची बैठक घेत त्यांना भाडे ठरविले. त्यानंतर अधिकारी बदलले आणि या लोकांनी क्रीडा कार्यालयाला भाडे न देताच मैदानावर हक्क गाजविणे सुरू ठेवले. याचा फटका सर्वसामान्य खेळाडू, क्रीडा प्रेमींना बसत आहे. सर्वसामान्यांना मैदान अपुरे पडत असल्याचा प्रतिक्रिया ऐकावयास येत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार राजरोस सुरू असताना क्रीडा कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
दरम्यान, हे लोक खेळाडूंकडून नाममात्र शुल्क आकारणीच्या नावाखाली हजारो रूपये क्रीडा संकुलाच्या मैदानावर कमावत असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत तक्रारी केल्यास काही लोक राजकीय दबाव आणत असल्याचेही काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. राजकीय हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे संकुलात दुकानदारी जोरात सुरू आहे. याचा त्रास खेळाडू, क्रीडा प्रेमी आणि वॉकला येणाऱ्या नागरिकांना होत आहे. यावर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
बीपीएलचे भाडेही थकले
क्रीडा संकुलात काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करीत बीड प्रीमिअर लिग क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. याचे जवळपास २३ हजार रूपये भाडे झाले होते. मात्र, अद्यापही हे भाडे असोसिएशनने दिलेले नाही. क्रीडा अधिकाऱ्यांनीही तोंडी सुचनांशिवाय पुढे काही केले नसल्याचे सूत्रांकडून समजते. बीपीएलच्या समितीशी संपर्क झाला नाही.
वृक्षारोपणासाठीवरून वाद; परंतु तक्रार टाळली
काही दिवसांपूर्वीच क्रीडा संकुलात वृक्ष लावण्यावरून खाजगी व्यक्ती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यात वाद झाला होता. यावेळी शहर पोलिसांनी दोघांना ताब्यातही घेतले होते. त्यानंतर मात्र, याबाबत कसलीही तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली नाही. हे प्रकरण आपसात मिटवून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अशा प्रकारांमुळेच दिवसेंदिवस हे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे.
संकुलातील मैदान, हॉलचा वापर करायचा असेल तर समितीच्या नियमाप्रमाणे भाडे देणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत अपवादात्मक लोक वगळता कोणी भाडे दिले नाही. आता सर्वांकडून भाडे वसूल करू. भाडे न दिल्यास कारवाई केली जाईल.
- अरविंद विद्यागर, जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड