वर्षपूर्ती दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची, शोधासाठी पोलिस ठाण्यासमोर केक कापून गांधीगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 01:25 PM2023-11-24T13:25:46+5:302023-11-24T13:27:02+5:30
दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची वर्षपूर्ती; पोलिस ठाण्यासमोर केक कापून केली गांधीगिरी
परळी: येथील मोहन व्हावळे यांच्या दुचकीची चोरी होवून एक वर्ष उलटले. मात्र, अद्याप दुचाकी सापडू शकली नाही. यामुळे दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या वर्षपूर्तीचा चक्क पोलीस स्टेशन समोर केक कापून गांधीगिरी करत निषेध करण्यात आला.
या बाबतची माहिती अशी की, मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पत्रकार मोहन व्हावळे यांची दुचाकी बसस्टँड रोडवरून चोरीस गेली. संभाजी नगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून आता एक वर्ष झाले. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप दुचाकीचा शोध लागू शकला नाही. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी पुढाकार घेऊन संभाजीनगर पोलीस स्टेशनसमोर चक्क या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची वर्षपूर्ती झाली म्हणून केक कापून गांधीगिरी केली. यावेळी पोलीस स्टेशनसमोर गाडीचा फोटो बॅनरवर लावून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना निवेदन देण्यात आले.
पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा लवकरात लवकर शोध लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे. यावेळी विजय जोशी, वैजनाथ कळसकर, सचिन स्वामी, धनंजय आढाव, प्रकाश चव्हाण, प्रवीण फुटके, ज्ञानोबा सुरवसे, संभाजी मुंडे, दत्तात्रय काळे, महादेव शिंदे, संजीब रॉय आदी उपस्थित होते.