Ganesh Mahotsav: गोशाळेत शेणातून साकारल्या गणेशमूर्ती, तीन हजार पर्यावरणपूरक मूर्ती विकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 07:35 AM2022-08-30T07:35:56+5:302022-08-30T07:39:34+5:30
Ganesh Mahotsav: माजलगाव तालुक्यातील देवखेडा येथे असलेल्या गोशाळेत यावर्षी प्रथमच शेणापासून बनवलेल्या गणेशमूर्तींना पुणे, मुंबई येथून मोठी मागणी होत आहे.
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील देवखेडा येथे असलेल्या गोशाळेत यावर्षी प्रथमच शेणापासून बनवलेल्या गणेशमूर्तींना पुणे, मुंबई येथून मोठी मागणी होत आहे. हा गणपती बनवताना केवळ शेण, गोमूत्र व कापूर याचाच वापर करण्यात आला आहे. शेणाच्या गणपतीमुळे पर्यावरणालाही फायदा होणार आहे. आतापर्यंत या गोशाळेतून तीन हजार मूर्ती हातोहात विकल्या गेल्या आहेत.
हे गणपती बनविण्याचे काम एप्रिल महिन्यात सुरू झाले. हे गणपती केवळ गायीचे शेण, गोमूत्र व कापराचा वापर करून तयार केले आहेत. आतापर्यंत ३ हजार गणेशमूर्ती बनविल्या आहेत.
...यापासून बनविल्या मूर्ती
गणेशमूर्ती ताज्या शेणापासून न बनवता जुन्या गोवऱ्या गिरणीच्या साह्याने बारीक करून त्यामध्ये पाणी न टाकता गोमूत्र व कापराचे मिश्रण करून साकारल्या आहेत.
विसर्जनानंतर झाडांना संजीवनी
शेणापासून बनविलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन नदी किंवा इतर ठिकाणी करण्याची गरज नाही. घरी बादलीभर पाण्यातदेखील विसर्जन करून हे पाणी घरातील झाडांना किंवा बागेतील झाडांना देऊ शकता. यातून झाडांना चांगले शेणखत मिळून संजीवनी मिळते.
गो-धन वाचविण्यास मदत
आम्ही यावर्षी पहिल्यांदाच शेणापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविल्या आहेत. यामुळे गो-धन वाचवायला मदत होईल. आम्ही शेणखत ज्या भावात विकतो त्या भावापेक्षा आम्हाला या गणेशमूर्तींच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळाले आहे. या मूर्तींना चांगली मागणी आहे. पुढील वर्षापासून जास्तीत जास्त गणेशमूर्ती बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
-कल्याण गुंजकर, गो-सेवक, माजलगाव