गणेशाचे मुखदर्शन, मंडपात दर्शनास प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:32 AM2021-09-13T04:32:06+5:302021-09-13T04:32:06+5:30
बीड : गणेश उत्सवादरम्यान मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश प्रशासनाने जारी केले ...
बीड : गणेश उत्सवादरम्यान मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने गणेशोत्सव २०२१करिता मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे मुखदर्शन घेण्यास अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून, दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे.
सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक होते. जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने हे आदेश बीड जिल्ह्याच्या हद्दीत २० सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील असे प्रशासनाने कळविले आहे.
-------
या मनाई आदेशाच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ कालावधीमध्ये मूर्तीचे दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून द्यावे, असे आदेश लागू करण्याबाबत पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी निर्देश दिले आहेत.
---------