किराणा दुकान फोडणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:39 AM2021-03-01T04:39:01+5:302021-03-01T04:39:01+5:30
बीड : रात्रीच्या वेळी बंद असलेले किराणा मालाचे दुकान फोडून माल लंपास करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. ही ...
बीड : रात्रीच्या वेळी बंद असलेले किराणा मालाचे दुकान फोडून माल लंपास करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ फेब्रुवारी रोजी पेठ बीड भागात केली. यावेळी चोरट्यांकडून चार लाख २५ हजार रुपयांचे किराणा सामान जप्त करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील नेकनूर, पाटोदा, परळी, धारूर, आदी तालुक्यांत रात्रीच्या वेळी बंद असलेले किराणा दुकान फोडून त्यातील तेलाचे डबे, काजू-बदामसह महाग वस्तू चोरी झाल्याचे गुन्हे घडले होते. दरम्यान, या ठिकाणच्या चोरट्यांचा शोध पोलीस घेत होते. हे चोरटे काल रात्री चोरलेला माल विकण्यासाठी बीड शहरात माल घेऊन आले होते. त्यापैकी समीर शेख शमोद्दीन व अफजल खान ऊर्फ बब्बू कासिम खान (दोघे रा. बिलालनगर, इमामपूर रोड बीड) हे दोघे माल विक्रीसाठी मोढा भागातील मोठे किराणा दुकान शोधत होते. याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून बार्शी नाका येथून त्या चोरट्यांना ताब्यात घेतले.
चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी पोलिसांनी केली; मात्र गुन्हा केल्याचे त्यांनी प्रथम नाकारले. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी त्यांच्या साथीदारांमार्फत १७ डिसेंबर २०२० रोजी नेकनूर येथील अझहर ट्रेडिंग, ३ जानेवारी २०२१ रोजी पाटोदा येथील आर.के. मॉल, २५ जानेवारी २०२१ रोजी धारूर येथील तिरुपती ट्रेडिंग व ३० जानेवारी २०२१ ला परळी येथील जय प्रोव्हिजन या दुकानातून तेलाचे डबे, सुका मेवा व इतर मालाची चोरीची केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या एकूण मालापैकी दोन लाख २५ हजार रुपये किमतीचे तेलाचे डबे, सुका मेवा व इतर किराणा सामान तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण चार लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपी व मुद्देमाल नेकनूर पोलीस ठाण्यात पुढील तपास कामासाठी ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नेकनूर पोलीस उपनिरीक्षक किशोर काळे करत आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध सुरू असून, लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख सपोनि भारत राऊत यांनी सांगितले.
गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
किराणा मालाच्या दुकानांमध्ये मागील काही काळात चोरीचे प्रकार घडले होते. या प्रकरणातील आरोपी अटक झाल्यानंतर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तपासदरम्यान इतर चोरीचे गुन्हेदेखील उघड होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून वर्तविली जात आहे.
===Photopath===
280221\282_bed_25_28022021_14.jpeg
===Caption===
चोरी करणारी टोळी मुद्देमालासह पकडली