डोळ्यात चटणी टाकून लुटणारी टोळी जेरबंद, आंध्र प्रदेशातून आले बीडला; पकडले परभणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 09:39 PM2018-06-20T21:39:52+5:302018-06-20T21:39:52+5:30
रस्त्यात थांबलेल्या वाहनधारकांना अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणारी टोळी मंगळवारी मध्यरात्री गजाआड करण्यात आली.
पाथरी (जि. परभणी)/गंगामसला (जि. बीड) : रस्त्यात थांबलेल्या वाहनधारकांना अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणारी टोळी मंगळवारी मध्यरात्री गजाआड करण्यात आली. पकडलेले शेख जावेद शेख सुलेमान, शे.नसीर शे.सुलेमान, करुणाकरन व्यंकटेश रलू तंनेरू हे तीनही लुटारू आंध्र प्रदेशातील आहेत. ही कारवाई माजलगाव व पाथरी पोलिसांनी पाथरी (जि. परभणी) येथील बायपास रोडवर केली. पकडलेल्या लुटारूंची बुधवारी रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू होती.
गंगामसला येथील निवृत्ती तुकाराम सोळंके हे मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता खरात आडगाव येथुन आपल्या दुचाकी(एम एच४४-२९७९)वर गावाकडे परतत असताना राष्ट्रीय महामार्गावरील छोटीवाडी येथील एका पेट्रोल पंपाच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यातील एकाने तात्काळ मिरची पुड काढून सोळंके यांच्या डोळ्यात टाकली. यामुळे ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन पाथरीच्या दिशेने पसार झाले. सुदैवाने सोळंके यांनी त्यांच्या दुचाकीचा क्रमांक पाहिला होता. त्यानंतर ही माहिती तात्काळ गंगामसला येथील काही तरूणांना समजली. काही तरूणांनी लगेच दुचाकीवरून चोरट्यांचा पाठलाग केला. तोपर्यंत ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांना समजली. त्यांनी पोउपनि विकास दांडे यांना आदेश देऊन गंगामसला दिशेने रवाना केले. त्यानंतर स्वत: नवटकेही चोरट्यांच्या पाठलागावर होत्या.
दोन चोरट्यांना ग्रामस्थांचा चोप
गंगामसला पाटीवर काही जणांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्यांच्याही डोळ्यात मिरची पूड टाकून हे चोरटे पाथरीकडे निघाले़ पाथरी-तुरा या रस्त्याने निघालेली चोरट्यांची दुचाकी एका खदानीजवळ घसरली आणि चोरटे खाली पडले़ यावेळी खदानीजवळ काम करणाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला़ हे लोक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून एका चोरट्याने खदानीत उडी मारली तर दोघे चोरटे वेगवेगळ्या दिशेने पळून गेले़ पहाटे तीनच्या सुमारास पाथरी आणि माजलगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी खदानीत पडलेल्या शेख वजीर शेख सुलेमान यास खदानीतून बाहेर काढून पाथरी पोलीस ठाण्यात आणले़ पळून गेलेल्या दोघा चोरट्यांपैकी शेख जावेद शेख सुलेमान हा तुरा या गावात शिरला़ अंगावरील फाटके कपडे, भिजलेले शरीर पाहून ग्रामस्थांचा संशय बळावला़ काहींनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यास पकडून बेदम मारहाण केली़ नंतर त्यास ग्रामस्थांनी पाथरी पोलिसांच्या हवाली केले़ दुसरा चोरटा करुणाकरन व्यंकटेश रलू तंनेरू हा पाथरी शहराजवळील आष्टीफाट्यावर सकाळी ९ वाजता पोहचला़ या ठिकाणीही ग्रामस्थांचा तोच समज झाला आणि या चोरट्यास पकडून शेत आखाड्यावर नेऊन मारहाण केली़ माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले़ सकाळी १० वाजेच्या सुमारास पाथरी पोलीस ठाण्यात नागरिकांचा मोठा जमाव जमला होता़ या नागरिकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना धावपळ करावी लागली़ या तिन्ही आरोपींना घेऊन पोलीस माजलगावकडे गेले़ त्यानंतर जमाव शांत झाला़ चोरट्यांकडून एक दुचाकी (एम एच २६-३५८१) जप्त करण्यात आली आहे.
पाथरी शहरात पोलिसांची जनजागृती
चोरट्यांना पकडल्याच्या घटनेनंतर ही वार्ता तालुक्यात वाºयासारखी पसरली़ मुले पळविणाºया दोघांना पकडल्याची अफवा पसरली़ त्यामुळे पाथरी पोलिसांना शहरात फिरून जाहीर आवाहन करावे लागले़ पकडलेले आरोपी मुले पळविणारे नसून अट्टल चोरटे आहेत़ अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले़
गंगाखेडमध्येही दोघांना चोप
गंगाखेड (जि. परभणी) : मुले पळविणारे असल्याचा संशय घेऊन गंगाखेड शहरात बसस्थानक रस्त्यावर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोघांना चोप दिला. मध्यप्रदेशातील हे दोघे बुधवारी गंगाखेड शहरात आले होते. मुले पळविणाºया टोळीतील असल्याचा संशय घेऊन या दोघांना नागरिकांनी मारहाण केली. काही नागरिकांनी या दोघांची सुटका करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले.