बीडची गांजा तस्करीतील 'पुष्पा' गँग; ओडिशातून ३ हजाराने घेऊन महाराष्ट्रात १५ हजाराने विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 03:28 PM2022-08-23T15:28:24+5:302022-08-23T15:32:23+5:30
ओडिशातून तेलंगणामार्गे महाराष्ट्रात गांजा; आंतरराज्य टोळीतील मास्टरमाईंडसह चौघे बीडचे
बीड : ओडिशातून स्वस्तात गांजा खरेदी करून तेलंगणामार्गे महाराष्ट्रात आणून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात तेलंगणातील राचाकोंडा पोलिसांना २१ ऑगस्ट रोजी यश आले. या टोळीतील सहाजणांना सापळा रचून अटक केली. धक्कादायक म्हणजे टोळीतील सूत्रधारासह चौघे आरोपी बीडचे रहिवासी आहेत. दोन वाहने, सहा क्विंटल गांजासह सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मास्टरमाईंड करण परशुराम परकाळे (वय २७, रा. पिंप्री, ता. आष्टी), अजय महादेव इथापे (३१), संतोष अनिल गायकवाड (३०, रा. चिंचोली धानोरा, ता. आष्टी), आकाश शिवाजी चौधरी (२३, रा. टाकळी अमिया, ता. आष्टी), विनोद लक्ष्मण गाडे (४०, रा. निमगाव चोबा, ता. आष्टी), भुक्या साई कुमार (२७, रा. नागुलू, ता. अनंतगिरी, जि. सूर्यपेठ, ओडिशा) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील भुक्या साई कुमार हा मध्यस्थ असून, राजू मलकागिरी, भीमा मलकागिरी व अंबोथू नागराजू (सर्व रा. सूर्यपेठ, ओडिशा) यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. मात्र, ते फरार आहेत. यापैकी अंबोथू नागराजू याच्यावर तेलंगणातील घटकेसर पोलीस ठाण्यात गांजा तस्करीच्या गुन्ह्यात २०२० मध्ये अटक झाली होती. तोच या टोळीला गांजा पुरवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
२१ ऑगस्ट रोजी एक मालवाहू जीप (एमएच १६ एई-४५२३) व कारमधून (एमएच ११ बीव्ही-३००२) ओडिशातून ५ क्विंटल ९० किलो गांजा तेलंगणामार्गे महाराष्ट्राकडे जात असल्याची माहिती तेलंगणातील राचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांना मिळाली होती. त्यांनी विशेष पोलीस पथक व राचाकोंडा पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. अब्दुलपूरम पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचून या टोळीच्या मुसक्या आवळल्या. ५९० किलो गांजा, आठ मोबाईल, दोन वाहने व रोख १९०० रुपये असा एकूण एक कोटी ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत, अतिरिक्त आयुक्त जी. सुधीर यांच्या मार्गदर्शनाखाली एल. बी .नगर विभागाचे उपायुक्त सनप्रित सिंग, विशेष पथकाचे उपायुक्त के. मुरलीधर, सहायक आयुक्त डी. व्यंकन्ना नाईक, विजय श्रीनिवास, पोलीस निरीक्षक ए. सुधाकर, व्ही. स्वामी, उपनिरीक्षक ए. ए. राजू, के. प्रताप रेड्डी व अंमलदारांनी ही कारवाई केली.
किलोमागे १२ हजारांचा नफा
दरम्यान, ही टोळी ओडिशातून तीन हजार रुपये किलोप्रमाणे खरेदी केलेला गांजा महाराष्ट्रात १५ हजार रुपये किलोने विक्री करत असे, अशी माहिती तपासात समोर आली आहे. यावरून गांजा तस्करीतील अर्थकारणाचा अंदाज येऊ शकतो.
सूत्रधार तीन गुन्ह्यांत वाँटेड
टोळीचा सूत्रधार करण परकाळे याच्यावर तेलंगणात २०२० मध्ये गांजा तस्करीचे तीन गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांत तो वाँटेड आहे. आता त्याला तिन्ही गुन्ह्यांत टप्प्या-टप्प्याने अटक केली जाणार असल्याची माहिती आयुक्त महेश भागवत यांनी दिली. इतर तीन आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.