प्रक्रिया करण्याऐवजी खड्डे करून टाकला जात आहे कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:08+5:302021-05-22T04:31:08+5:30
: ग्रामस्थांचा विरोध माजलगाव : येथील नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी केसापुरी येथे पाच एकर जागेत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा घेतली ...
: ग्रामस्थांचा विरोध
माजलगाव :
येथील नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी केसापुरी येथे पाच एकर जागेत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा घेतली होती. मागील सहा महिन्यांपासून याठिकाणी कचरा टाकला जात आहे. तो या ठिकाणी जाळला जात होता. आता या ठिकाणी चक्क जेसीबीने खड्डे करून त्यात कचरा टाकला जात आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचऱ्यासाठी ग्रामस्थांनीदेखील विरोध केला आहे.
माजलगाव नगरपालिकेने २० वर्षांपूर्वी शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या केसापुरी येथे पाच एकर जागा घेतली होती. ही जागा घेतल्यानंतर या ठिकाणी नगरपालिकेकडून कचरा न टाकता सिंदफणा नदीपात्राशेजारी हा कचरा टाकला जात असे. सहा महिन्यांपासून नगरपालिकेने स्वच्छतेचे टेंडर दिल्यानंतर हा कचरा येथे आणून टाकला. त्यावर प्रक्रिया करण्याऐवजी तो कचरा जाळला जात आहे. हा कचरा जाळल्याने केसापुरी येथील ग्रामपंचायत व नागरिकांनी नगरपालिकेला अनेक वेळा लेखी व तोंडी सांगूनही नगरपालिकेने संबंधीत गुत्तेदाराला साधी समजदेखील दिली नाही. आता तर संबंधीत गुत्तेदाराने याच ठिकाणी जेसीबीद्वारे येथील ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच मोठमोठे खड्डे केले आहेत. या खड्ड्यात कचरा टाकला जात आहे.
.....
कचरागाड्या अडविल्या
१५ दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी कचरा आणणाऱ्या गाड्यादेखील अडवल्या होत्या.
आता पाऊस पडल्यावर खड्ड्यात पाणी साचणार आहे. यामुळे कचऱ्याची दुर्गंधी पसरण्याची शक्यता आहे. यामुळे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी खड्डे करण्यास व त्यात कचरा टाकण्यास विरोध केला आहे.
दरम्यान, येथील ग्रामपंचायतीने तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
....
माजलगाव नगरपालिकेच्या केसापुरी येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर कचरा आणून, त्यावर प्रक्रिया करण्याऐवजी तो जाळला जात आहे. आता याठिकाणी मोठमोठे खड्डे करून त्यामध्ये कचरा टाकण्यात येत आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचल्यास त्याची दुर्गंधी पसरणार असल्याने आमच्या गावच्या लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे. हे खड्डे तत्काळ बुजवण्यात यावेत. नसता आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल.
-विलास साळवे, ग्रामपंचायत सदस्य, केसापुरी.
...
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमानुसारच आम्ही या ठिकाणी काम करीत आहोत.
-विशाल भोसले, मुख्याधिकारी, माजलगाव नगरपालिका.
===Photopath===
210521\img_20210516_130229_14.jpg
===Caption===
केसापुरी येथील कचरा डेपोत माजलगाव शहरातून कचरा आणून खड्डे करुन त्यात कचरा टाकण्यात येत आहे.