'आर्मीमधून बोलतोय...'; सैन्यात अधिकारी असल्याची थाप मारून व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 05:02 PM2021-09-11T17:02:39+5:302021-09-11T17:08:31+5:30
फोनवरून बोलणाऱ्या भामट्यांवर विश्वास ठेवून व्यापाऱ्याने रक्कम ऑनलाईन पाठवली.
अंबाजोगाई ( बीड ) : मोबाईलवर संपर्क करुन आर्मीत अधिकारी असल्याची बतावणी करत एका भामट्याने अंबाजोगाई येथील एका गॅस व्यापाऱ्याची लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणात गॅस विक्रेत्याकडून तब्बल १ लाख ३५ हजार ४१५ रुपयाची रक्कम अनोळखी भामट्यांनी लंपास असून शहर ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे.
सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वेगाने वाढत चालले आहेत. कधी अॅप डाऊनलोड करण्याचे सांगत तर कधी ओटीपी विचारुन घेत नागरिकांच्या बँक खात्यातून लाखोंच्या रकमा ऑनलाईन लांबवल्या जात आहेत. अशा चोरट्यांचा यंत्रणेलाही तपास लागणे आव्हानात्मक ठरू लागले आहे. असाच एक प्रकार अंबाजोगाईत समोर आला आहे. शहरातील अभय संजय पवार हे खासगी गॅस एजन्सी चालवतात. ८ सप्टेंबर रोजी त्यांना दोन अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. ‘मी आर्मीमधून बोलतोय, आमचा अंबाजोगाई येथे कॅम्प होणार आहे. त्यासाठी आम्हाला १५ व्यवसायीक गॅस कनेक्शन पाहिजेत. त्याचे पैसे आमच्या हेड ऑफीसवरुन रिफंड होतील असे फोनवरुन बोलणार्या अनोळखी व्यक्तीने पवार यांना सांगितले.
हेही वाचा - गुरूंच्या विरहाने शिष्याने सोडले प्राण; समाधीस्थळीच घेतला अखेरचा श्वास
फोनवरून बोलणाऱ्या अनोळखी भामट्यांवर विश्वास ठेवून पवार यांनी ९ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पाठवली. त्यानंतरही संबंधीताने काम चालू आहे असे सांगत वेळोवेळी एकुण १ लाख ३५ हजार ४१५ रुपये पाठवण्यास भाग पाडले. ही रक्कम पाठवल्यानंतर पवार यांना कसलाही रिफंड मिळाला नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १० सप्टेंबर रोजी शहर ठाण्यात फिर्याद नोंदवली. यावरुन अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. पो.नि.बाळासाहेब पवार अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - दिवट्या मुलाचा प्रताप; मृत वडिलांची बनावट सही करून ६५ लाखांवर डल्ला