गावंदरा हल्ला प्रकरण : मारहाणीचा बनाव करणार्या पोलिसांची चौकशी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:34 AM2018-01-30T11:34:55+5:302018-01-30T11:35:39+5:30
पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार हातून पळून गेल्यानंतर जीप पेटवून ऊसाने मारहाण केल्याचा बनाव केलेल्या धारुर पोलिसांची चौकशी खात्यांतर्गत सुरु झाली होती. १५ दिवस उलटूनही ती अद्याप अपूर्णच आहे. उप विभागीय पोलीस अधिकार्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
बीड : पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार हातून पळून गेल्यानंतर जीप पेटवून ऊसाने मारहाण केल्याचा बनाव केलेल्या धारुर पोलिसांची चौकशी खात्यांतर्गत सुरु झाली होती. १५ दिवस उलटूनही ती अद्याप अपूर्णच आहे. उप विभागीय पोलीस अधिकार्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
१४ जानेवारी रोजी धारुर तालुक्यातील गावंदरा तांड्यावर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत आरोपी आल्याची माहिती मिळाली. धारुर ठाण्याचे उप निरीक्षक चंद्रकांत घोळवे हे तोकडा बंदोबस्त घेऊन त्याला पकडण्यासाठी रवाना झाले. विशेष म्हणजे याची माहिती वरिष्ठांना दिली नाही. तांड्यावर गेल्यानंतर आरोपीला बेड्याही ठोकल्या. परंतु तोकड्या बंदोबस्ताचा फायदा घेऊन त्या आरोपीने पलायन केले. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून या पोलिसांनी शासकीय वाहन जाळून उसाने मारहाणीचा प्रयत्न केल्याचा बनाव केला.
यासोबतच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही ठाण्यात नोंद केला. परंतु हे सर्व प्रकरण संशयास्पद असल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोराडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. वेगवेगळे मुद्दे तपासून उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक यांना चौकशीचे आदेश दिले.तब्बल १५ दिवस उलटूनही नाईक यांनी चौकशी पूर्ण न केल्याने संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी लक्ष घाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
पोलीस निरीक्षक गंधमही संशयाच्या भोवर्यात
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, हे प्रकरण धारुर पोलिसांना चांगलेच अंगलट येणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गंधम हे मात्र या प्रकरणापासून दूर राहत आहेत. यापूर्वीही ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांवर वचक नसल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडून दिलेला अट्टल गुन्हेगार विलास बडे याने ठाण्यातून पलायन केले होते. हे प्रकरण गंधम यांच्यावरही शेकणार असल्याचे समजते.
जबाब बाकी आहेत
संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचे जबाब घ्यावयाचे आहेत. त्यानंतरच खरी परिस्थिती समोर येईल. दहा दिवसात चौकशी पूर्ण केली जाईल.
- मंदार नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, केज