गावरान आमराई नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:00+5:302021-05-07T04:35:00+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात बहुतेक गाव, वाडी, वस्ती, तांडेच्या शिवारात विविध जातीच्या गावरान आमराईच्या थाटी बहुतेक शेतकऱ्याच्या शेतात होती. ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात बहुतेक गाव, वाडी, वस्ती, तांडेच्या शिवारात विविध जातीच्या गावरान आमराईच्या थाटी बहुतेक शेतकऱ्याच्या शेतात होती. प्रत्येक आंब्याच्या वृक्षाची वेगळी ओळख. कालांतराने संकरित आंब्याच्या आगमनाने काळाच्या ओघात गावरान आमराई मात्र नामशेष होताना दिसत आहे. मोरेवाडी शिवारात वाडवडिलांची आठवण म्हणून गावरान आंब्याची आमराई मोरेवाडी ग्रामस्थ आजही जतन करत असून, गावरान आंब्याचा खार व रसाची चव मोरेवाडीकरांना आजही चाखायला मिळत आहे.
तालुक्यातील गाव, वाडी, वस्ती, तांड्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर गावरान चार दोन तरी गावरान आंब्याची झाडे असायची. वाडवडिलांनी डोक्यावर पाणी आणून आमराई जोपासली. गावरान झाड भले मोठे तर व्हायचेच. पण दोन तीन गुंठे जागेची व्याप्तीचा भला मोठा घेर असायचा. या झाडांपासून फळांबरोबर उन्हाळ्यात सावलीचाही आधार शेतकऱ्यांना होता. प्रत्येक आंब्याला वेगळी चव व ओळख होती. गोट्या आंबा, काळी गोटी, केळीच्या आकाराचा केळ्या आंबा, मोठा शेंद्र्या आंबा, बारका शेंद्र्या आंबा, शेप्या आंबा काळसर व जास्त आंबट चव तो आमट्या, गोड आंबा, काळा गुंड, पांढरा गुंड, केसऱ्या, नाकाडया, शेप्या गोटी अशा आंब्यांची ओळख होती. एक एक आंब्याच्या घोसाला पंधरा ते वीस आंब्याच्या ओझ्याने कित्येक वेळा फांदी मोडून पडायची. एक वृक्षापासून पाच ते दहा हजार फळे मिळायची. गावरान आंब्याला मागणी वाढली असली तरी गावरान आमराई काळाच्या ओघात नामशेष झाल्या हे वास्तव आहे. संकरीत आंबा खाण्यासाठी गोड असला तरी शहरी, ग्रामीण भागात खारासाठी (लोणचे) मात्र गावरान आंब्याचा वापर केला जात आहे.
आंब्याच्या झाडाकडे पाहिले तर वाडवडिलांच्या आठवणीला उजाळा मिळतो व त्यांनी जोपासलेल्या आंब्याच्या स्वादाचा आनंद आमची पिढी घेत आहे. त्यावेळी वाडवडील एकोप्याने राहात होते म्हणून आमराई लावू शकले, हे मात्र नक्की आहे. - श्रीनिवास सदाशिव मोरे, शेतकरी मोरेवाडी.
माझ्या शेतात संकरीत आमराई जोपासली आहे. वातावरणात बदल झाला की, संकरीत आमराईवर रोगांचा प्रादुर्भाव होऊन मोहोराची गळती होते. संकरीत आंब्याला मागणी चांगली असली जोपासण्यासाठी खर्च जास्त लागतो. गावरान आंब्यावर बदलत्या वातावरणाचा प्रादुर्भाव जास्त होत नाही. पावसाच्या पाण्यावर गावरान झाडाचे संगोपन होते. ही आमराई खर्चिक नसते. - अनुरथ बांडे, शेतकरी, सुगाव.
===Photopath===
060521\06bed_1_06052021_14.jpg