गेवराई तालुका पशुचिकित्सालय समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:37 AM2018-07-13T00:37:21+5:302018-07-13T00:39:21+5:30
येथील तालुका पशुचिकित्सालय रिक्त पदांमुळे सलाईनवर आहे. ३ वर्षांपासून सहायक आयुक्त पद रिक्त आहे. प्रभारींवर पशुचिकित्सालयाचा गाडा हाकला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : येथील तालुका पशुचिकित्सालय रिक्त पदांमुळे सलाईनवर आहे. ३ वर्षांपासून सहायक आयुक्त पद रिक्त आहे. प्रभारींवर पशुचिकित्सालयाचा गाडा हाकला जात आहे. अनेकवेळा पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालकांना खाजगी डॉक्टरांकडे जाऊन पशुंवर उपचार करावे लागत आहेत.
गेवराई येथे सहायक आयुक्त पशुसंवर्धन अंतर्गत तालुका लघु पशू चिकित्सालय आहे. या चिकित्सालयांतर्गत तालुक्यातील गेवराई, धोंडराई, खळेगाव, मालेगाव, शिरसमार्ग, सिरसदेवी, भेंडटाकळी, टाकरवण, तिंतरवणी, निपाणी जवळका, पाचेगाव, पाडळसिंगी, दैठण, रेवकी, या चौदा गावातील पशुधनावर उपचार केले जातात, या चौदा गावांमध्ये साधारणत: १० हजारांच्या आसपास पशुधन आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या काळात शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यासह इतर जनावरांना पोटफुगी, फऱ्या, घटसर्प आदी आजार उद्भवत असतात. या आजारात पशुधन दगावण्याची भीती अधिक असते. पावसाळयात जनावरांना होणारे आजार पाहता लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे आहे. मात्र या चिकित्सालयातील पशुधन वैद्यकीय अधिकारी यांचे पद रिक्त आहे. यामुळे पशुंवर वेळेवर उपचार होत नाहीत. पशुचिकित्सालयात सहायक आयुक्त, पशुधन वैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, परिचर अशी पदे मंजूर आहेत. मात्र मागील तीन वर्षांपासून सहायक आयुक्तचे पद रिक्त आहे. तत्कालीन कार्यरत असलेले पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.बी.रनसकर सेवानिवृत्त झाल्यानंतर तीन वर्षांपासून प्रभारी अधिकाºयांवरच या पदाचा कारभार सुरू आहे. पशुधन पर्यवेक्षक, परिचर, ड्रेसर ही पदे रिक्त असल्याने पशुंना वेळेवर उपचार मिळत नाहीत. सध्या बीड येथील डॉ.एच.के. शेख प्रभारी पशुधन विकास अधिकारी यांच्यावर या चिकित्सालयाचा गाडा चालू आहे.
शासकीय योजनांचाही लाभ मिळेना
रिक्तपदांमुळे शासनाच्या दुधाळ संकरित गाई, म्हशी गट वाटप अनुजाती लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे गट वाटप शेळी, मेंढी गट वाटप, मांसल पक्षी, कडबा कुटी यासह पशुसंवर्धन विभागाअंतर्गत येणाºया शासकीय योजनांपासूनही शेतकरी वंचित राहत आहेत.
सोयी सुविधांची वानवा
पशुचिकित्यालयात सोयी सुविधांचीही मोठी वानवा आहे चिकित्सालयाच्या इमारतीसह शौचालयाची दुरवस्था झाली आहे. विजेचा अभाव असून जनावरांसाठी अथवा कार्यालयाच्या कामकाजासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. इमारतमध्ये भांगर जमा झाले असून, जनावरांना पोटदुखी झाल्यास पाण्यात मिसळून द्यायचे औषध तर पावसाच्या पाण्याने भिजले आहे, असे चित्र आहे.
पदे भरण्यासाठी पाठपुरावा
याबाबत पशुधन विकास अधिकारी श्रेणी १ एन.ए. सानप म्हणाले, मी पशुधन विकास अधिकारी श्रेणी १ म्हणून रूजू झालो असून, तालुक्यामध्ये सहायक आयुक्त पद १, वरिष्ठ लिपीक पद १, ड्रेसर १, पशुधन पर्यवेक्षक रिक्त ६, मंजूर १३ परिचर रिक्त ८ मंजूर पदे १३ आहेत. इत्यादी पदे रिक्त आहेत. वरील पदे भरण्यासाठी मी येण्याअगोदर पाठपुरावा केलेला असून, मी पण या बाबत वरिष्ठांना कळविण्यासाठी पाठपुरावा करेल, असे सांगितले.