राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट'चा प्रयत्न, एटीएसचे पथक परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 06:44 PM2022-08-29T18:44:54+5:302022-08-29T18:45:09+5:30
औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसल्याची माहिती
परळी (बीड): तालुक्यातील दाऊतपुर शिवारातील राख तळ्यातील घट्ट झालेले ढीग मोकळे करण्यासाठी जिलेटिन वापरून ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची दखल घेत सोमवारी एटीएसच्या औरंगाबाद व बीड येथील अधिकाऱ्यांनी तसेच बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि बॉम्ब शोध व नाशक पथकाने भेट देऊन पाहणी केली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून येथे पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन परिस्थितीचा आढावाही घेण्यात आला आहे. यावेळी एटीएस (दहशतवाद विरोधी पथक औरंगाबाद)चे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पालवे, एटीएसचे पीआय खंदारे ,एपीआय शितल चव्हाण यांच्यासह बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर उपस्थित होते. दरम्यान, बॉम्ब शोध व नाशक पथकाने राख तलावाची पाहणी केली.
एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशीत मिश्रा, अंबाजोगाई चे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये परळी ग्रामीण एपीआय मारुती मुंडे हे ही यावेळी उपस्थित होते. परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसर प्रतिबंधित क्षेत्र असल्याने व मर्मस्थळ असल्याने एटीएसचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशीत मिश्रा व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राख तळ परिसरास भेट दिली. जिलेटीन जप्त करण्यात आल्याने या मागे कोणाचा हात असू शकतो यावर चर्चा करण्यात आली.
काय आहे प्रकरण
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख तळ्यात काही अज्ञात व्यक्तीनि दि 26 रोजी राख मोकळी करण्याकरिता स्फोटके आणल्याची खबर मिळताच औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षा कर्मचारी सतर्क झाले. जिलेटीन स्फोटके वापरत असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांना आढळून आले. केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेऊन परळी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. परंतु, ब्लास्टिंग चे काम देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर व राख वाहतूक करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही.
वीज निर्मिती केंद्रास धोका नाही
औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसून या ठिकाणाहून औष्णिक वीज निर्मिती केंद्र 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. सदरील घटनेमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. औष्णिक वीज निर्मिती केंद्राची सुरक्षा व्यवस्था चोख आहे, असे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी स्पष्ट केले असले तरी पोलीस यंत्रणा ही सतर्क झाली आहे