ब्लास्टिंग करताना जिलेटिन स्फोट; कामगार १० फूट उंच उडून पडला विहिरीत, जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 16:02 IST2025-03-21T16:02:31+5:302025-03-21T16:02:58+5:30
अंबाजोगाई तालुक्यातील तळेगाव शिवारातील घटना; अन्य दोन मजूर गंभीर जखमी

ब्लास्टिंग करताना जिलेटिन स्फोट; कामगार १० फूट उंच उडून पडला विहिरीत, जागीच मृत्यू
अंबाजोगाई : तालुक्यातील तळेगाव घाटशिवारात विहिरीचे काम सुरू होते. या कामावर ब्लास्टिंग करताना जिलेटिनचा स्फोट झाल्याने एक कामगार १० फूट विहिरीच्या बाहेर येऊन परत विहिरीत पडल्याने जागीच मृत्यू पावला. अन्य तिघेजण जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर एकावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ११:३० वाजता घडली.
अंबाजोगाई तालुक्यातील तळेगाव घाट तांडा शिवारात उत्तम पांडुरंग आडे यांना शासनाची वैयक्तिक जलसिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरीचे काम सुरू असताना मंगळवारी या विहिरीमध्ये जिलेटिनचे स्फोट घेण्यात आले. उर्वरित कामकाज सुरू असताना सकाळी ११:३० च्या सुमारास विहिरीतील जिलेटिनचा स्फोट झाल्याने धनराज अनंत दहीफळे (रा. खोडवा सावरगांव, ता. परळी) हा मजूर विहिरीच्या बाहेर १० फूट उंच उडून परत विहिरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पिंटू विठ्ठल दहीफळे, जीवन हरिश्चंद्र दहिफळे, भारत तुकाराम पवार हे गंभीररीत्या जखमी झाले.
त्यांच्यावर अंबाजोगाई आणि लातूरमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक चेतना तिडके, पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले, बर्दापूर पोलिस ठाण्याचे स.पो.नि. राजकुमार ससाने, चेवले यांनी घटनास्थळाला भेट दिली.