नवीन औष्णिक केंद्रातून क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 12:51 AM2019-12-04T00:51:31+5:302019-12-04T00:52:55+5:30
नवीन औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत.
परळी (जि. बीड) : येथील नवीन औष्णिक विद्युत केंद्राने दोन दिवसांपूर्वीच तिन्ही संचातून क्षमतेपेक्षा जास्त वीजनिर्मिती करून उच्चांक गाठला. शंभर टक्केपेक्षा जास्त वीजनिर्मिती करण्याची नवीन औष्णिक विद्युत केंद्राच्या उभारणीनंतर ही पहिलीच वेळ आहे. एकूण ७५० मेगावॅट क्षमतेच्या तिन्हीही संचातून ३० नोव्हेंबर रोजी एकूण ७६६ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती झाली, ती १०२ टक्के ग्राह्य धरली गेली.
नवीन औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. यामध्ये संच क्र मांक ६, संच क्र मांक ७ व संच क्र मांक ८ हे तीन संच आहेत. ३० नोव्हेंबर रोजी संच क्र मांक ६ मधून २५६ मेगावॅट, ७ मधून २५६ मेगावॅट व ८ मधून २५४ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती झाली. क्षमतेपेक्षा जास्त वीज निर्मिती तिन्ही संचांतून झाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. वीज निर्मितीसाठी लागणारा दगडी कोळसा परळी विद्युत केंद्रात एक लाख मे. टन उपलब्ध आहे व कोळशाची आवक सुरू आहे. त्यामुळे कोळशाचा तुटवडा भासत नाही व खडका धरणात पाणी साठा मुबलक आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने बंद असणारे संच आता मात्र सुरळीत चालू आहेत, अशी स्थिती असताना १ डिसेंबर रोजी मात्र संच क्र मांक ७ हा बंद ठेवण्यात आला. संच क्रमांक ७ मंगळवारी कार्यान्वित होईल, असे उपमुख्य अभियंता के. एम. राऊत यांनी सांगितले.