मराठासह धनगर, मुस्लिम समाजांना आरक्षण मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:26 AM2018-11-26T00:26:18+5:302018-11-26T00:26:47+5:30
मराठा आरक्षणाचे काम करताना आम्ही इतर जातीचा व्देष करत नाहीत. धनगर आणि मुस्लिम समाज यांनादेखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेताना या महाराष्ट्रातील अठरा पगड जातींना सोबत नेण्याचे काम शिवसंग्रामच्या माध्यमातून १८ वर्षांपासून होत आहे. मराठा आरक्षणाचे काम करताना आम्ही इतर जातीचा व्देष करत नाहीत. धनगर आणि मुस्लिम समाज यांनादेखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी मांडली.
शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेच्या वतीने रविवारी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे, लक्ष्मण ढवळे, जि.प. सदस्य अशोक लोढा, भारत काळे, विजयकांत मुंडे, शहराध्यक्ष सुभाष सपकाळ, सरचिटणीस राहुल मस्के, अनिल घुमरे, सुहास पाटील, रामहारी मेटे, गणेश बजगुडे, पं.स. सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, पं.स. सदस्य बबन माने, प्रसिध्दी प्रमुख मनोज जाधव, तालुका अध्यक्ष सचिन कोटुळे, अमेर जमा, मुज्जफर चौधरी, दशरथराव मोरे, राजेंद्र बहिर, अजय सुरवसे, राजेंद्र आमटे, अॅड. गणेश मोरे, आनंद जाधव आदी उपस्थित होते.
आ. मेटे यांनी शिवसंग्रामच्या वाटचालीचा आढावा मांडत कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचा विश्वास दिला. आगामी काळात सुदर्शन धांडे, नवनाथ काशिद, नवनाथ प्रभाळे, कल्याण जानवळे यांच्या सारख्या बहाद्दर मावळयांच्या जोरावर या बीड मतदारसंघामध्ये शिवसंग्रामचे प्रभावी काम करणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प. सदस्य अशोक लोढा यांनी केले. कार्यक्रमासाठी तालुक्यातील व शहरातील शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.